Pune: वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता सायबरचे दाेन विभाग
By भाग्यश्री गिलडा | Published: June 27, 2023 04:11 PM2023-06-27T16:11:31+5:302023-06-27T16:12:34+5:30
वाढत्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सायबर गुन्हयांचा तपास किचकट असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे...
पुणे : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्शवभूमीवर पुण्यात सायबरचे दोन विभाग करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग करून सायबर गुन्ह्यांची विभागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
वाढत्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सायबर गुन्हयांचा तपास किचकट असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे. सायबर पाेलीस ठाण्यात सध्या फक्त ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा शाेध घेतांना पाेलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून पुणे पाेलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सायबर पाेलीस ठाण्याचे पूर्व व पश्चिम असे दाेन विभाग करुन सायबर गुन्हयांचे तपासाचे विक्रेंद्रीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अशी असेल रचना
पुणे पाेलीसांचे पश्चिम विभागात परिमंडळ एक, दाेन व तीनचा समावेश असून त्यामध्ये फरासखाना विभाग, विश्रामबाग विभाग, स्वारगेट विभाग, लष्कर विभाग, काेथरुड विभाग व सिंहगड राेड विभागाचा समावेश आहे. यामध्ये एकूण १८ पाेलीस ठाण्यांचा समावेश असून सदर पाेलीस ठाण्यात यापुढे घडणाऱ्या सायबर गुन्हयांचा तपास पश्चिम विभागाचे सायबर पथक करणार आहे. त्यासाठी एका वरिेष्ठ पाेलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर पश्चिम विभागासाठीसुद्धा एका स्वतंत्र वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन्ही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणार असून कामाच्या जबाबदारीचे विभाजन करण्यात येणार आहे. पूर्व भागात परिमंडळ चार व परिमंडळ पाचचा समावेश असून त्यामध्ये खडकी, येरवडा, हडपसर आणि वानवडी या विभागाचा समावेश असून त्यात एकूण १४ पाेलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सायबर चाेरटे वेगवेगळया प्रकारचे अमिष दाखवून नागरिकांना काेटयावधी रुपयांचा गंडा घालत असल्याचे दिसून येत आहे. सायबर चाेरटे हे प्रामुख्याने परराज्यातून गुन्हे करत असल्याने तसेच वेगवेगळया बँक खात्याचा, माेबाईल क्रमांकाचा, साेशल मिडिया माध्यमांचा वापर करत असल्याने तपास गुंतागुंतीचा हाेऊन त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असते. अशावेळी अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपास करताना मर्यादा येतात. त्यामुळे पाेलीसांनी प्रत्येक पाेलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे तपासाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पुणे शहरातील सायबर गुन्हेगारीच्या तक्रारी
- सन २०२१ - १९०२३
- सन २०२२ - १९४०८
- सन २०२३ - ६५००
शहरात वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सायबर पाेलीस ठाण्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व विभाग व पश्चिम विभाग असे सायबर पाेलीस ठाण्याचे स्वतंत्र विभाग हाेऊन तपासाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. नागरिकांचे दृष्टीनेही अशाप्रकारे कामाचे विक्रेंद्रीकरण फायदेशीर आहे.
- रितेश कुमार, पाेलीस आयुक्त पुणे शहर