Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

By नितीश गोवंडे | Published: November 18, 2024 07:59 PM2024-11-18T19:59:55+5:302024-11-18T20:00:39+5:30

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलिसांनी कसली कंबर

In the wake of the polls the police are well arranged in Pune | Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणेपोलिसांसह ग्रामीण पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. मंगळवारी (दि. २०) मतदान होणार असून, शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. या दोन दिवशी कोणताची अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मतदान केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्ताचा आढावा मागील दोन ते तीन दिवसांपासून घेतला जात आहे.

तब्बल १४० पोलिस अधिकारी, ५ हजार २५५ पोलिस कर्मचारी, १ हजार ८७० होमगार्डसह केंद्र व राज्य सुरक्षा दलाच्या १७ कंपन्या मतदानाच्या दिवशी तैनात असणार आहेत. मतदान कक्ष बंदोबस्त, संवेदनशील मतदारसंघातील नियोजन, बोगस मतदान रोखण्यासाठीचे प्लॅनिंग, पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष भरारी पथक, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके शहरभर लक्ष ठेवून असणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

प्रत्येक बुथवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिस कर्मचार्यांसह होमगार्डची नियुक्ती केली जाणार आहे. त्याशिवाय संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त नेमला जाणार आहे. संबंधित ठिकाणी मायक्रो ऑब्झरर्व्हर लक्ष देणार असून बुथ परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी संवेदनशील असलेल्या इमारतीत पोलिसांनी मायक्रो प्लॅनिंग केले असून, इन्स्टंट रिस्पॉन्स टीमही तैनात केली जाणार आहे. त्याचा फायदा मतदान प्रक्रिया सुरू असताना एखादी अनुचित घटना घडल्यास रोखण्यास मदत होणार आहे. अवघ्या चार ते पाच मिनिटांत हे पथक घटनास्थळी दाखल होऊन कारवाईवर भर देणार आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्यासह प्रत्येक झोनचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांकडून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

शहरातील पोलिस बंदोबस्त..

पोलिस उपायुक्त -११, सहायक पोलिस आयुक्त - २२, पोलिस निरीक्षक -६४, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक - ३११, पोलिस कर्मचारी -५ हजार २५५, होमगार्ड - १ हजार ८७०, सीएपीएफ (केंद्रीय सशस्त्र पोलिस बल) आणि एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस बल) - १७ कंपन्या असा ५ हजार २५५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. याशिवाय शहरात ३१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांची फिरती पथके असणार आहेत. तसेच सीसीटीव्हींव्दारे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

पुणे पोलिस दलातील १ हजार पोलिस कर्मचारी पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर येथे बंदोबस्तासाठी गेले असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

शहरातील ७१६ इमारतीमध्ये ३ हजार ३३१ बूथ आहेत तर ५८ इमारतीमध्ये १० पेक्षा जास्त बूथ आहेत. त्यापैकी १ संवेदनशील बूथ आहे. तर ७४ पोलिस संवेदनशील इमारती आहेत. हे सर्व १३८ सेक्टरमध्ये विभागणी केली आहे. तेथे सहायक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक असतील तसेच गरजेच्या वेळी दोन ते तीन मिनिटांत पेट्रोलिंग व्हॅन पोहोचू शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या ४० टीम कार्यरत असून, त्यामध्ये ३०० कर्मचारी तैनात असणार आहेत. ६ क्यूआरटी आणि घातपात, बॉम्ब शोधक व नाशक पथके कार्यरत असणार आहेत.

पोलिसांकडून रात्रीची विशेष गस्त..

मतदारांना मतदानाच्या दोन दिवस आधी विविध आमिषे दाखवली जातात. तसेच मोठ्याप्रमाणात पैशांचे वाटपही केले जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची विशेष गस्त सोमवार (दि. १८) पासून कार्यरत केली आहेत. तसेच सकाळी गुड मॉर्निंग पथकाद्वारे देखील गस्त घालण्यात येणार आहे. वारजे, पाटील इस्टेट, संगमवाडी, नागपूर चाळ, जनता वसाहत, नाना पेठ अशा संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातही कडेकोट पोलिस बंदोबस्त...

पुणे जिल्ह्यात देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी १ पोलिस अधीक्षक, २ अपर पोलिस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३५ पोलिस निरीक्षक, २८७ पोलिस उपनिरीक्षक, ३ हजार २४६ पोलिस कर्मचारी, २ हजार ६०० होमगार्ड, केंद्रीय बलाच्या ११ कंपनी आणि राज्य राखीव पोलिस बलाची १ कंपनी तैनात असणार आहे.

Web Title: In the wake of the polls the police are well arranged in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.