"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:05 PM2024-10-29T15:05:36+5:302024-10-29T15:07:19+5:30
पुढील काळात मला भाजप आणि महायुती सरकारमध्ये न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी दिली
पुणे : पुण्यात पर्वती विधानसभेच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच दिसून आली होती. पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ इच्छुक असताना माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मिसाळ यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मी ‘लढणार आणि जिंकणारच’ असा नारा त्यांनी दिला होता. परंतु या मतदारसंघातून मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर नाराज श्रीनाथ भिमाले यांनी २ दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. भिमाले बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांचे बंड थंड झाले असून महायुतीचे सरकार आणण्यासाठी लढणार आणि जिंकणार असा नारा देत पक्षाच्या कमाला सुरुवात केली आहे.
भिमाले म्हणाले, मागच्या ४ दिवसापूर्वी मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. नंतर त्यांची माझी भेटही झाली. त्यांनी सांगितलं की, आपल्याला महायुतीचे काम करायचंय सरकार आणायचं आहे. पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू. तुम्ही महायुतीच्या जागा आणण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला ८ उमेदवार निवडून आणायचे आहेत. मी २७ वर्षे काम करतोय. सर्व नेते देवेंद्रजी, मुरलीधर मोहोळ सोबत आहेत. राज्यात देवेंद्रजींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं. लहान भाऊ म्हणून मला शब्द दिला. की मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे मी पुढं जाऊन अशी भूमिका करायला नको असं कार्यकर्त्यांना सांगितलं. आता ८ आमदार निवडून आणायचे काम करणार आहोत. आम्ही कुठलंही बंड करणार नव्हतो. भारतीय जनता पार्टी मध्ये मला न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र आणि मुरली भाऊंनी दिली. मी कुठलाही अपक्ष फॉर्म भरणार नाही. मी फक्त भाजपच काम करत राहणार आहे. आता महायुतीचे सरकार आणण्यासाठी लढणार आणि जिंकणार. महायुती आणि भाजपसाठी काम करत राहणार.