संकटात कलेने दिला जीवन जगण्याला आधार; फूटपाथवर बसून चित्र रेखाटणाऱ्या वृद्धाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 11:03 IST2022-10-11T10:59:01+5:302022-10-11T11:03:00+5:30
अपघातामध्ये पाय गेला. काहीच करता येईना एकाच जागी बसून असल्याने उदरनिर्वाहाचे साधन बंद पडले....

संकटात कलेने दिला जीवन जगण्याला आधार; फूटपाथवर बसून चित्र रेखाटणाऱ्या वृद्धाची कहाणी
- मानसी जोशी
पुणे : माणसाच्या अंगात असलेली कला कधीच वाया जात नाही. कलेच्या जोरावर राजेंद्र खळे (वय ६५) आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे चित्रकार गेली दीड वर्षे लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर बसून चित्र रेखाटतात. एक वाईट गोष्ट आपले सर्व आयुष्य बदलवू शकते, असे आपण म्हणतो; पण असे काहीसे प्रत्यक्ष या चित्रकाराच्या आयुष्यात घडले.
कुटुंबामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक वडील वारले. या धक्क्याने आई मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली. अठराव्या वर्षीच पैसे कमवण्यासाठी त्यांना बाहेर पडावे लागले. संपूर्ण ५ वर्षे जगभर मिळेल ते काम करत आईचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत केला. जवळ जवळ ५ वर्षे असे काढल्यानंतर पुण्यात आता स्थायिक व्हावे आणि काही तरी नोकरी करावी असे ठरवले; परंतु त्यांचा अपघात झाला.
अपघातामध्ये पाय गेला. काहीच करता येईना एकाच जागी बसून असल्याने उदरनिर्वाहाचे साधन बंद पडले. एके दिवशी कोरा कागद आणि पेन हातात घेतला आणि समोर पेपरात आलेले चित्र रेखाटले काही सराव नसताना चित्र उत्तम रेखाटले गेले. मग ठरवले आता हेच आपले उदरनिर्वाहाचे साधन. रस्त्यावर बसून चित्र रेखाटू लागले.
येणारी जाणारी लोक चित्र पाहत थांबू लागली. मदत म्हणून काही ते विकतही घेऊ लागली. काही मुलांनी मिळून मला राहण्याची सोय करून दिली. त्यातून दोन वेळचे खाणे भागू लागले. कला ही कधी वाया जात नाही. हातात काही नसेल तरी कला तुमचे पोट भागवू शकते.