ही शाईफेक घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते; चंद्रकांत पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:48 AM2022-12-12T09:48:30+5:302022-12-12T09:48:40+5:30
लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविण्याचा माझा कोणताही विरोध नव्हता
पुणे: चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर भाजप मधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानतंर पोलिसांनी शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून या प्रकरणाबाबत सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. तर भाजपचे कार्यकर्ते शाईफेकीचा निषेध करताना दिसून येत आहेत. या प्रकारणावरून खुद्द चंद्रकांत पाटलांनी सवाल उपस्थित केला आहे. ही बाब घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते, असे ते यावेळी म्हणाले आहेत.
''लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविण्याचा माझा कोणताही विरोध नव्हता. मी दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला झाला. ज्या पद्धतीने हल्लेखोरांनी माझ्यावर शाईफेक केली. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला धरून नव्हती. असे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, हा हल्ला नियोजित होता. पडद्यामागून कट रचणारे हल्लेखोर सापडले आहेत. माझ्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जाेतिबा फुले यांच्याबद्दल कोणताही अनादर नाही. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची मी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही हा भ्याड हल्ला ठरवून केला, असे त्यांनी सांगितले.