लाेकमत रिपाेर्ताज | ससूनमध्ये रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:33 AM2023-02-16T11:33:34+5:302023-02-16T11:33:44+5:30

ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत माेठे सरकारी रुग्णालय...

Inadequate facilities in sasoon hospital Patients relatives on the street | लाेकमत रिपाेर्ताज | ससूनमध्ये रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर!

लाेकमत रिपाेर्ताज | ससूनमध्ये रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर!

Next

ज्ञानेश्वर भाेंडे/आशिष काळे

पुणे : ससून रुग्णालयाचा परिसर... रात्रीचे साडेअकरा वाजलेले...रुग्णालयाच्या मुख्य गेटचा अर्धा दरवाजा लावलेला... रुग्ण आणि नातेवाइकांना बसण्यासाठी बांधलेल्या न्यूराेसर्जरी, पाेटविकार विभागाच्या इमारतीसमाेरील फरशीवर ओळीने झाेपलेले रुग्णांचे नातेवाईक... काहींनी तर बाह्यरुग्ण विभागाच्या बाजूला उघड्यावर झाेपलेले. बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ससून रुग्णालयात दिवसा आणि रात्रीही थांबणे, जेवणासाठीच्या सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसाेय हाेत आहे. ‘लाेकमत’च्या टीमने प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला असता वरील चित्र दिसून आले.

ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत माेठे सरकारी रुग्णालय. सर्वच आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार हाेतात. त्यामुळे सामान्यांसाठी हे रुग्णालय माेठे आधार आहे. मात्र, त्यांच्यासाेबत येणाऱ्या नातेवाइकांसाठी मात्र सुविधा अपुरी पडल्याचे दिसून आले.

बाह्यरुग्ण विभागाच्या थाेडे पुढे गेलाे असता उजव्या बाजूला थाेड्या आडाेशाला दाेन-दाेन असे चार रुग्ण अंगावर चादरी घेऊन झाेपलेले आढळले. आणखी पुढे गेल्यावर संपूर्ण रस्ता सून-सान हाेता. कॅज्युअल्टीच्या बाहेरील पटांगणात बऱ्यापैकी रुग्णांची वर्दळ हाेती. दाेन चार ॲम्ब्युलन्स उभ्या हाेत्या. त्यापैकी एक्या ॲम्ब्युलन्समधून रुग्ण उतरून कॅज्युअल्टीकडे जात हाेते.

अपुऱ्या सुविधा :

नातेवाइकांना थांबण्यासाठी, विश्राम करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तीन शेल्टर (निवारे) बांधले आहेत. यातील एक समाजसेवा अधीक्षक कार्यालयाच्या आवारात, दुसरे बर्न वाॅर्डच्या समाेर आणि तिसरे दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू कक्षाच्या बाहेरील बाजूस आहे. तेथे जेवण वगैरे सुविधा नाहीत. तसेच रुग्णांची संख्या पाहता हे तीनही शेल्टर अपुरे पडत असल्याचे दिसून आले.

विसावा शेल्टरची स्थिती

कॅज्युअल्टीच्या समाेरच वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभागाचे कार्यालय आहे. ते बंद हाेते. या कार्यालयाच्या आवारातच मुकूल माधव फाउंडेशनचे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून उभारलेले सुमारे दाेन हजार स्क्वेअर फुटांचे रुग्णांच्या नातेवाइकांसाठीचे विसावा शेल्टर आहे. वरून पत्रे, बाजूने जाळीचे कंपाउंड, बसण्यासाठी कडप्प्याची फरशी असे याचे स्वरूप आहे. या ठिकाणी काही नातेवाईक झाेपलेले हाेते, तर काही जेवण करत हाेते.

नाश्त्यावरच दिवस काढण्याची वेळ :

सुमारे ४५ वर्षांच्या संगीता खोत रुग्णालयाच्या आवारात थांबल्या हाेत्या. त्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या संख गावातून आलेल्या. स्वत:च आजारी. आठ दिवसांपासून त्या येथे आहेत. त्यांना गिळता येत नव्हते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी येथे पाेटाची शस्त्रक्रिया झाली. बरे वाटत नसल्याने पुन्हा ॲडमिट व्हायचे हाेते. त्यामुळे त्या आलेल्या. त्या सांगत हाेत्या, माझ्यासाेबत कधी भाऊ येताे. ताे रात्रीच्या वेळी येथेच मुक्कामाला थांबताे. जेवण बाहेरून विकत आणावे लागते. कधी कधी तर नाश्त्यावरच दिवस भागवताे.

काही निरीक्षणे

- रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे हाेते. मात्र, ते चाेरट्यांनी ताेडलेले दिसले. येथे रुग्णांच्या नातेवाइकांच्या माेबाइलवर चाेरट्यांनी डल्ला मारल्याचा अनेकांचा अनुभव.

- पूर्वी बर्न वाॅर्ड असलेल्या जेकाॅब ससून या जुन्या वारसास्थळाच्या इमारतीसमाेर एक माेठे शेल्टर उभे केलेले. तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांच्या कार्यकाळात दगडुशेठ हलवाई देवस्थानकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून हे शेल्टर उभारलेले. येथे मात्र कंपाउंड, सुरक्षा रक्षक, आदी दिसले. काही नातेवाईक बाकड्यांवर बसलेले, तर काही झाेपलेले हाेते.

- डेड हाउस, नवीन ११ मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ काही नातेवाईक घुटमळत हाेते. पुढे इन्फाेसिस इमारतीच्या समाेरून जात हाेताे. इमारतीच्या बाहेर आवारात कडप्प्यांवर ओळीने दहा ते पंधरा नातेवाईक झाेपलेले दिसून आले.

३० ते ४० टक्के रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील

ससून हे टर्शरी केअर वैद्यकीय सेवा पुरविणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत माेठे रुग्णालय आहे. नवीन इमारत मिळून येथे जवळपास दोन हजार बेडची साेय आहे. पुणे शहर व ग्रामीणमधील जवळपास ६० टक्के रुग्ण उपचारासाठी येथे येतात. तसेच अहमदनगर, सातारा, साेलापूर, काेल्हापूर, सांगली, बीड, परभणी या जिल्ह्यांतूनही अनेक रुग्ण उपचारांसाठी येथे येतात. त्यांची संख्या जवळपास ३० ते ४० टक्के आहे.

रुग्णासाेबत हवा एकच नातेवाईक!

उपचार घेत असलेल्या रुग्णांसाेबत एक नातेवाईक थांबण्यास परवानगी आहे. रात्रीच्या वेळी एक नातेवाईक रुग्णांसाेबत असताे, त्यांच्यासाेबतच ते रात्री आराम करू शकतात. जास्त नातेवाईक असतील तर बाहेरील निवाऱ्यांमध्ये थांबावे लागते.

मेंदूशस्त्रक्रिया, हृदयविकारचे रुग्ण अधिक :

प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय आहे. तेथे प्रसूती, सर्वसाधारण शस्त्रक्रिया हाेतात. मात्र, मेंदूची शस्त्रक्रिया, बाळांच्या शस्त्रक्रिया, मूत्रविकार, हृदयाचे बायपास, ॲंजिओप्लास्टी व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी ससूनमध्ये रेफर केले जातात. यात अगदी एक दिवसांच्या बाळापासून १०० वर्षांच्या आजाेबापर्यंतचे आणि स्त्री व पुरुष असे रुग्ण उपचारासाठी येतात.

एका रुग्णावरील उपचार १० ते १५ दिवस :

एकदा रुग्ण येथे दाखल झाला की त्याच्यावर पूर्ण उपचार हाेण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस किंवा काही वेळा महिनाही लागताे. कारण, रुग्णालय व डाॅक्टरांच्या तुलनेत रुग्णसंख्येचा लाेड अधिक आहे. ताे पाहता प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यासाठी नेहमीपेक्षा उशीर लागताेच.

स्वच्छतागृह अपुरे अन् अस्वच्छ!

रुग्णालयातील नातेवाइकांसाठी तीन शेल्टर असले तरी त्यांना जाेडून एकही टाॅयलेट नाही की आंघाेळीसाठी बाथरूम नाही. बाह्यरुग्ण विभागाच्या शेजारी एक टाॅयलेट आहे. ते संपूर्ण नातेवाइकांसाठी एकमेव आहे. तेदेखील प्रचंड अस्वच्छ असते. महिलांकडून पैसे घेतल्याचाही अनुभव आहे.

मी माझ्या आईच्या उपचारासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात ससूनमध्ये महिनाभर हाेताे. त्यावेळी वाॅर्डमध्ये नातेवाइकांसाेबत झाेपायचाे. बाहेर थांबावे लागायचे त्यावेळी खाेक्याचे पुठ्ठे जमा करून त्यावर झाेपावे लागले. नातेवाइकांसाठी याेग्य ती सुविधा हवी.

- माेहन राउत, रुग्णाचे नातेवाईक (रा. लाडजळगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर)

रुग्णांसाेबत एक नातेवाईक असताे. त्याला वाॅर्डमध्येच थांबण्याची मुभा असते. त्यापेक्षा अधिक नातेवाईक असतील तर त्यांना बाहेरच थांबावे लागते. त्यांच्यासाठी तीन शेल्टर आहेत. दगडूशेठ हलवाई ट्रस्टने बांधलेले शेल्टर दूर पडत असल्याने नातेवाईक तेथे फारसे थांबत नाहीत. अंघोळ व बाथरूम सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मारवाडी धर्मसंमेलन संस्थेतर्फे लवकरच नातेवाइकांसाठी नवीन धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.

- डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

Web Title: Inadequate facilities in sasoon hospital Patients relatives on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.