कोव्हिड लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याने नीरा येथे ज्येष्ठ नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:50+5:302021-03-23T04:10:50+5:30
नीरा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या तसेच ६० वर्षे व पुढील ज्येष्ठ ...
नीरा :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या तसेच ६० वर्षे व पुढील ज्येष्ठ नागरिकांचे सलग लसीकरण सुरू आहे. त्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र येथील लोकसंख्या विचारात घेता आरोग्य केंद्रात रोज शंभर लोकांचे लसीकरण होत असून नोंदणीसंख्या मात्र जास्त आहे. लस उपलब्धता कमी होत असल्याने आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अॅप, वेबसाईटच्या माध्यमातून लसीकरण करण्यासाठी नोंदणी केली जात आहे. नीरा ही मोठी बाजारपेठ असून तालुक्यातील मोठे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नोंदणी होत आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राने टोकन देऊन पहिल्या शंभर जणांना लस देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना पुढील दिवशी लस घेण्यास सांगितले जात असल्याने मग ऑनलाईन नोंदणी करण्याचा फायदा काय? असा प्रश्न नागरिक विचारात आहे.
खासगी दवाखान्यांनी डावलले नियम -
सध्या उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच इतर काही सहव्याधी असणारे ४५ ते ५९ तसेच ६० वयोगटाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. परंतु, खासगी ठिकाणी नियमावलीचे पालन न करता सर्रास लसीकरण केले जात आहे. याबाबत तहसीलदारांनी लक्ष घालून माहिती मागवून यातील भ्रष्टाचार उघडकीला आणण्याची मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी केली आहे.
-