पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे उद्घाटन, खादी उद्योगाला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:12 AM2017-11-17T06:12:10+5:302017-11-17T06:13:08+5:30
खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे.
पुणे : खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे. यासंदर्भातील योजना तयार करून महसूल विभागाकडील व पालिका हद्दीतील जागेवर अधिकाधिक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यातून महाखादी हा बँ्रड केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रमुख ब्रँड म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राच्या आणि ग्रामीण कारागीर संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, महेश लांडगे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी बारा बलुतेदारांचे गुण जोपासण्याची गरज आहे. त्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकत नाही. त्यामुळेच विशाल चोरडिया यांनी या वस्तूंचे योग्य मार्केटिंग केले आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी खासदार निधीतून महाखादीसाठी निधी दिला. सर्व खासदारांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे, असे नमूद करून फडणवीस म्हणाले, राज्यातील लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना एक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी पत्र लिहिणार आहे.