अग्निशमनची गाडी नसतानाच केंद्राचे उद्घाटन
By admin | Published: January 4, 2017 05:30 AM2017-01-04T05:30:49+5:302017-01-04T05:30:49+5:30
कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध
पुणे : कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर
गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध
करून देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात
आला आहे. त्यामुळे अग्निशमन
केंद्राचे उद्घाटन हा केवळ दिखावा ठरला असल्याची जोरदार
टीका मंगळवारी नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.
कोंढवा येथील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर या केंद्राला गाडी
व मनुष्यबळ उपलब्ध करून
देण्यात आले नव्हते. त्यानंतर ६ दिवसांनी तिथल्या एका बेकरीला आग लागून ६ कामगारांचा मृत्यू झाला. या केंद्रामध्ये गाडी उपलब्ध असती तर ही घटना टाळता आली असती. पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसताना उद्घाटनाची घाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्य सभेत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली.
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले, ‘‘अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असून, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.’’
प्रशासनाच्या खुलाशानंतर नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. जर नवीन केंद्र सुरू करण्यासाठी मनुष्यबळ व फायर गाडी उपलब्ध नव्हती तर कोंढवा येथील केंद्राचे उद्घाटन करून दिखावा करण्याचा घाट का घालण्यात आला? अग्निशमन केंद्रासाठी कोणतीही मान्यता घेण्यात आली नसताना मुख्यमंत्री उद्घाटनासाठी का आले? यासाठी कोणाकडून घाई करण्यात आली?
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘कोंढव्यातील
जागा अग्निशमन केंद्रासाठी
राखीव असल्याने पालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आली. पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार
या केंद्राचे उद्घाटन करण्यात
आले.’’ (प्रतिनिधी)