नागपूर चाळीत प्रसूतिगृह व उपचार केंद्राचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:47 AM2018-08-23T03:47:16+5:302018-08-23T03:47:39+5:30
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महिला प्रसूतिगृह व ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत उपचार केंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
येरवडा : पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असून, या बाबीचा विचार करता पुणे महापालिकेने नागरिकांसाठी चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. या सुविधांचा नागरिकांनीही जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
नागपूर चाळमधील (प्रभाग २) पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महिला प्रसूतिगृह व ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत उपचार केंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव, आमदार जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका शीतल सावंत, फरजाना शेख, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आयुब शेख उपस्थित होते.
सिद्धार्थ धेंडे म्हणाले, आपण या प्रसूतिगृहाकरिता पालिकेकडे प्रयत्न केले. येथे ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, शहरी गरीब व दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व आरोग्य तपासणी व उपचार केले जातील. पुणे महापालिकेने यासाठी किस्ना डॉयग्नोस्टिक संस्थेबरोबर करार करून ही सुविधा उपलब्ध केली आहे.
या वेळी महाराष्ट्र हौसिंग बोर्डात राहणारे ज्येष्ठ नागरिक नामदेवराव घाडगे यांना अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवणाºया २ तरुणांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविक केले. शीतल सावंत यांनी आभार मानले.
पथारीवाल्यांना आश्वासन
पथारीधारकांचे भाडे कमी करावे : पुणे महापालिकेकडून पथारीधारकांना आकारण्यात येणारे भाडे जास्त असून, हे भाडे कमी करण्याची सूचना बाबा आढाव यांनी मांडली. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत पालिकेतील पदाधिकाºयांना सूचना देण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.