उद्घाटन थाटात; गैरसोयींचा पाऊस

By admin | Published: July 4, 2017 04:19 AM2017-07-04T04:19:43+5:302017-07-04T04:19:43+5:30

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहाचे

In the inauguration; Inconvenient rain | उद्घाटन थाटात; गैरसोयींचा पाऊस

उद्घाटन थाटात; गैरसोयींचा पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते २८ जून रोजी थाटामाटात आणि धूमधडाक्यात पार पडले. मात्र, गेल्या उद्घाटनापासून आजतागायत या वसतिगृहातील मुलांच्या गैरसोयींच्या बाबतीत प्रचंड पाऊस असल्याचे दिसून आले, तर पाण्याविना वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह हे चार एकरांमध्ये बांधण्यात आलेले आहे. हे वसतिगृह पूर्वी जुन्या पद्धतीच्या बरॅक स्वरूपाच्या इमारतीमध्ये होते. सध्याच्या नवीन इमारतीमध्ये दोनशे विद्यार्थी क्षमता आहे. ५४ खोल्या, तीन अभ्यासिका कक्ष, दोन बहुउद्देशीय कक्ष, दोन गृहपान कार्यालय, दोन गृहपाल निवासस्थान, एक अभ्यागत कक्ष, दोन भोजन कक्ष, वाहनतळ, खेळाची दोन मैदाने, जॉगिंग ट्रॅक, उद्यान, कार्यक्रमासाठी खुला मंच अशा अद्ययावत सोयी-सुविधा या वसतिगृहामध्ये केवळ नावालाच आहेत. येथील मुलांची लोकमत टीमने प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता मुलांनी गैरसोयींच्या आणि अनेक समस्यांच्या बाबतीत सत्य परिस्थिती सांगून विदारक स्थिती कथन केली.
शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाने २६ जुलै २०११ रोजी नव्याने परिपत्रक जारी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे चालविली जातात. त्यांपैकीच येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह हे एक आहे. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे, तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासकीय वसतिगृहाची योजना सुरू करण्यात आली आहे.
संबंधित योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था, क्रमिक पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य इत्यादी सोयी सुविधा पुरविण्यात येतात; परंतु नव्याने सुरू झालेल्या येरवड्यातील या वसतिगृहामध्ये सोयी-सुविधांच्या बाबतीत बोंबाबोंब असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पाणीच नाही ?
वसतिगृह सुरू झाल्यापासून या ठिकाणी जुन्या प्रवेशित विद्यार्थ्यांना हडपसर येथील वसतिगृहातून येरवडा येथील वसतिगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांना पाणीच उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

जेवणानंतर विद्यार्थ्यांना हात धुवायला आणि पाणी पिण्यासाठीसुद्धा बाहेर हॉटेलात जावे लागते. एवढेच नव्हे तर पाण्याअभावी गेल्या अनेक दिवसांपासून वसतिगृहात सध्या राहत असलेले सुमारे ३० मुले अंघोळीशिवाय दिवस काढत आहेत.
जुन्या मुलांना एप्रिलपासून आजपर्यंत शासनाकडून दिला जाणारा सुमारे ८०० रुपयांचा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारा भत्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक विवंचनेत दिवस ढकलत आहेत.
बी.व्ही.जी. या खासगी संस्थेला वसतिगृहातील स्वच्छतेच्या बाबतीतचे कंत्राट मिळाले आहे; मात्र संपूर्ण इमारत उद्घाटनापासून आजतागायत स्वच्छता केली गेलेली नाही. त्यामुळे वसतिगृहामध्ये दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे.

विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी

पुणे : पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाच्या विश्रांतवाडीतील शासकीय वसतिगृहात दोन दिवसांपासून वसतिगृहातील ५०० विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आल्याचा प्रकार उघड झाला आहे. मेस बंद असल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत शिवसेनेच्या प्रतोद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे तक्रार केली आहे.
विशेष म्हणजे, या वसतिगृहात ३० अंध मुले आहेत. विद्यार्थ्यांनी रविवारपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. शिवसेना सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे यांनी या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर ही घटना समोर आली आहे.
रेक्टरकडे तक्रार करूनदेखील विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. प्रशासनाकडून अन्न व पाणी पुरवठा होईपर्यंत विद्यार्थ्यांना मदत करण्याचा सूचना भांडे यांना केल्या आहेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
याप्रकरणी अधिकारी, रेक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, मेस कंपनीचा करार संपण्याची तारीख सामाजिक कल्याण कार्यालयाला माहिती असते, तरीदेखील प्रशासनाने निष्काळजीपणा व कामचुकारपणा समोर येतो. मेस कंपनीचे करार संपण्याच्या एक ते दोन महिन्यांपूर्वीच निवेदिताकडून करार नूतनीकरण किंवा कंपनी बदल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक समाजकल्याण विभागाच्या मुली व मुलांचा वसतिगृहात दक्षता समितीची स्थापना करण्यात यावी, अशा मागण्या डॉ. गोऱ्हे यांनी बडोले यांच्याकडे केल्या आहे.

वसतिगृहासाठी मेस चालविण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीचा दोन दिवसांपूर्वी करार संपल्यामुळे मेस बंद झाली. पालिकेचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद झाल्याने प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवत होते. तीन दिवसांपासून टँकरनेदेखील पाणीपुरवठा न झाल्याने पाणी देखील उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला, तरी त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

Web Title: In the inauguration; Inconvenient rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.