पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:58 PM2022-09-01T15:58:59+5:302022-09-01T15:59:28+5:30
कोथरूड येथील संगम तरुण मंडळ मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर केला केला जातो
पुणे: कोथरूड भागातील संगम तरुण मंडळाला अफजल खानचा वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास कोथरुड पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रातून कळवले होते. तेच पोलीस निरीक्षक जगताप यांच्या हस्ते बहुचर्चित अफजलखानाचा वध देखाव्याचा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ आज सायंकाळी होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या अविस्मरणीय सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
कोथरूड येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्येछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर होतो. या वेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी अफजलखानाचा वध या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरूड पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र संबंधित मंडळाला पाठविले होते.
दरम्यान आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही देखावा करणार. आपण रोज घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फकत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. मग या शिवाजी महाराज यांचा इतिहास जर आम्ही हिंदुस्थानात दाखवायचं नाहीतर तो दाखवायला काय आम्ही पाकिस्तानात जायचं का? इतिहास नाकारता येणार आहे का...? पोलीस म्हणतात वरून आदेश आहे, हे वरून आदेश नेमके कोणाचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. तसेच मंडळाने आंदोलनाचं इशाराही दिला होता. त्यावेळी पोलिसांनी तातडीने देखावा सादर करण्यास परवानगी दिली.