स्वारगेट उड्डाणपुलाचे अखेर उद्घाटन
By admin | Published: June 21, 2015 12:10 AM2015-06-21T00:10:33+5:302015-06-21T00:10:33+5:30
स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे औपचारिक उद्घाटन
पुणे : स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे औपचारिक उद्घाटन शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेने या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यामुळे हा पूल चर्चेत आला होता. मात्र, या कार्यक्रमास शिवसेनेने दांडी मारली असली, तरी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खांद्याला खांदा लावून सहभाग घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या, तर या उद्घाटनाचा कार्यक्रम अवघ्या दहा मिनिटांत आटोपण्यात आला.
स्वारगेट येथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सुमारे १८०० मीटरचा ‘वाय’आकाराचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या ‘स्वारगेट ते साईबाबा मंदिर’ या सुमारे ५२३ मीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाट्न अद्याप निश्चित असताना, मागील आठवड्यात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या पुलाचे उद्घाटन त्या वेळी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव दिला. तो फेटाळण्यात आला होता. या वादात शिवसेनेने उडी घेत विनायक निम्हण यांनी अचानकपणे गुरुवारी आंदोलन करून, अनौपचारिक उद््घाटन केले होते. त्या आंदोलनास भाजपाने पाठिंबाही दिला नव्हता, तसेच या उद्घाटनासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळूनही त्याबाबत भाजपाने फारसा विरोध केलेला नव्हता. आज झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमास खासदार अॅड. वंदना चव्हाण, पालकमंत्री गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवसेनेशी दुरावा, राष्ट्रवादीला साथ ?
भाजपा नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला असताना, भाजपामध्ये कोणताही नाराजीचा सूर नव्हता. या उलट शिवसेनेने या मुद्याचे राजकरण करत, हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. त्या वेळी भाजपाकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
या पुलाच्या भूमिपूजनावेळी भाजपा नेत्यांना डावलल्याने भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी या पुलाचे भूमिपूजन केलेले होते. त्यामुळे या वेळी भाजपा-शिवसेना या पुलाचे उद्घाटन करण्याची शक्यता होती. मात्र, भाजपाने सेनेपासून दोन हात दूर राहणेच पसंत केले.
आज पवार यांच्या हस्ते उद्घाटनाच्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह भाजपाचे दहा ते बारा नगरसेवक उपस्थित होते. या उलट सेनेचे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपाच्या मनोमिलनाची चर्चा या वेळी रंगली होती.