भाषण प्रसिद्ध झाल्याने संमेलनाचे झालेय उद्घाटन !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:10 AM2019-01-08T01:10:26+5:302019-01-08T01:10:34+5:30

डॉ. श्रीपाल सबनीस : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मान्यवरांचे विचारमंथन

The inauguration took place due to the famous speech! | भाषण प्रसिद्ध झाल्याने संमेलनाचे झालेय उद्घाटन !

भाषण प्रसिद्ध झाल्याने संमेलनाचे झालेय उद्घाटन !

Next

पुणे : नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निंदनीय प्रकार संयोजन समितीने केला आहे. मात्र, सहगल यांचे भाषण ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संमेलनाचे आजच उद्घाटन झाले आहे, असे मी मानतो. उरलेले संमेलन ११ जानेवारीपासून सुरू होईल. उद्घाटकाविना संमेलन सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

घडलेला प्रकार सांस्कृतिक व राजकीय व्यवस्थेचेच हे अपयश आहे, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सहगल प्रकरणावर मार्मिक भाष्य केले. राजकीय दबावामुळे आयोजकांनी मागे घेतलेले निमंत्रण, विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रिया याबाबत सबनीस यांच्यासह राजकीय विश्लेषक विश्वंभर चौैधरी आणि अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर भावना व्यक्त केल्या.

वादविवाद स्वाभाविक आहेत...
विचारस्वातंत्र्याच्या युगामध्ये वादविवाद स्वाभाविक आहेत; मात्र वाद सत्यासाठी की स्वार्थासाठी? हा तात्त्विक मुद्दा आहे. आपल्याकडील राजकीय व्यवस्था साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी सुसंगत, पोषक नाही. याला सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. प्रमुख नेत्याची परवानगी न घेता मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयाने धमकी देणे आणि त्या दबावापोटी सांस्कृतिक अस्मिता गहाण ठेवून आमंत्रण मागे घेण्याचा प्रकार संयोजन समिती करीत असेल आणि त्यामध्ये महामंडळ कळत-नकळतपणे सहभागी असेल, तर ते निंदनीय आहे. राज ठाकरे यांच्याकडून उशिरा का होईना, दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.

आता ही बाब केवळ साहित्यक्षेत्राशी संबंधित राहिलेली नसून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी जोडली गेली आहे. नयनतारा सहगल यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. त्या नेहरू घराण्याशी संबंधित आहेत, म्हणून हा निर्णय घेतला असेल तर ते जास्त भयावह आहे. मनसेने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांचा विविध स्तरांवर निषेध करण्यात आला. एवढ्या छोट्याशा धमकीमुळे घाबरून संयोजक सहगल यांना बोलावणे रद्द करीत असतील, तर अशा वेळी राज्याचे गृह खाते काय करते? तुम्ही एका साहित्यिकेला संरक्षण देऊ शकत नसाल तर ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांकडून केला जात असेल तर आपण गृहमंत्री आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, आयोजकांवर मोठा दबाव निर्माण करण्यात आला. याविरोधात आम्ही आवाज उठविण्याचे ठरवले आहे. - विश्वंभर चौैधरी

आयोजकांच्या या कृतीमुळे संमेलनाची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण विवेकाने हाताळता आले असते, असे मला वाटते. काही अडचणी निर्माण होतील, असे वाटल्यास संयोजक तसेच महामंडळाने एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. नयनतारा सहगल यांना बोलावण्यामागील भूमिका सुरुवातीला समजून सांगितली असती, तर कदाचित संबंधितांचा विरोध मावळला असता आणि पुढचे रामायण घडले नसते. नयनतारा सहगल यांनी कायमच चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांचे जीवन मूल्याधारित होते. आता ही मूल्ये ढासळू लागली, तशा त्या अस्वस्थ होत राहिल्या. अयोग्य गोष्टींना त्यांनी कायम विरोध केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायम राजकीय स्थितीचा आढावा निर्भीडपणे घेतला आहे.
- प्रशांत तळणीकर

संयोजन समितीच्या निर्णयाशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असेल, असे मला वाटत नाही. मनसे आणि शेतकरी हक्क संघटना या दोन्ही घटकांच्या भूमिकेच्या दबावाखाली आयोजकांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. आयोजकांनी सत्यनिष्ठता जोपासून आपल्या भूमिकेवर ठाम राहणे आवश्यक होते. त्यांनी विरोधाला न जुमानता आमंत्रण कायम ठेवायला हवे होते. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. या प्रकरणाला जबाबदार असणारे सर्व घटक आत्मपरीक्षण करायला तयार आहेत का, हे पाहायला हवे. सत्यनिष्ठा जोपासता येत नसेल तर संमेलने घेता तरी कशाला? सहगल यांचे भाषण प्रकाशित झाले म्हणजेच संमेलनाचे उद्घाटन झाले; त्यामुळे आता पुन्हा संमेलनाला जाण्याची मला गरज वाटत नाही.
- डॉ. श्रीपाल सबनीस

Web Title: The inauguration took place due to the famous speech!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे