प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:10 PM2018-01-11T12:10:51+5:302018-01-11T12:15:08+5:30
प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
पुणे : प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले.
संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, ओरोगामी, सिरॅमिक आणि बारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सेनापती बापट रस्त्यावर ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक दीपक मिसाळ, ‘झागा’च्या संचालिका तीर्था मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी विशेष संधी देण्यात येणार आहे.’
मुंडे म्हणाल्या, ‘झागा ही आगळीवेगळी कल्पना आहे. वेगवेगळ्या कलाकृतींना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कलाकारांना त्यांची कला सादर करता येणार आहे, कला व कल्पकतेला वाव मिळणार आहे. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’
तीर्था मिसाळ म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीतापासून पॉप संगीतापर्यंत, भरतनाट्यापासून आधुनिक बेली डान्सपर्यंत आणि पारंपरिक वाद्यांपासून आधुनिक वाद्याचे सादरीकरण या ठिकाणी अनुभवता येणार आहे.’