नोकऱ्यांसाठी बेमुदत उपोषण
By admin | Published: January 21, 2016 01:13 AM2016-01-21T01:13:58+5:302016-01-21T01:13:58+5:30
एमआयडीसीला जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कायम नोकरीस सामावून घ्यावे, या मागणीसाठी सुमारे २१
बारामती : एमआयडीसीला जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कायम नोकरीस सामावून घ्यावे, या मागणीसाठी सुमारे २१ तरुणांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल सकाळीपासून वंजारवाडी गावातील तरुणांनी उपोषण सुरू केले. त्यापूर्वी महिनाभर अगोदर सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. २० वर्षांपूर्वी बारामती एमआयडीसीसाठी रुई, तांदूळवाडी, कटफळ, जळोची, वंजारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी स्थानिक मुलांना नोकरीत समावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांना त्याचा विसर पडला
आहे. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमआयडीसीने झटकली. सध्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या या परिसरात आहेत.
या कंपन्यांमध्ये कायम कामगार भरतीत स्थानिकांना डावलले जाते. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांच्या मुलांनादेखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळे परिसरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. भूसंपादन करताना कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सध्या परिसराचे नागरिकरण वाढत आहे.
रुई ग्रामीण रुग्णालयात केशव सुखदेव चौधर, नितीन नवनाथ
चौधर, गणेश संभाजी चौधर या
तिघा जणांना दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवणे,
उलटी होणे आदी लक्षणे या तरुणांमध्ये जाणवत आहे. या तरुणांप्रमाणेच उपोषणाला
बसलेल्या चौघांची स्थिती अशीच आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. (वार्ताहर)