राडारोडा व जलपर्णीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:57 AM2017-07-26T07:57:56+5:302017-07-26T18:39:02+5:30
पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डास आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नोंदवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
शहराचा मोठा भाग व्यापलेल्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात वाढलेल्या राडारोड्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढली आहे. पाण्यामध्ये वाढलेली जलपर्णी, कचरा यामुळे डास मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहराच्या हद्दीत खराडी, वारजे- माळवाडी, औंध, बोपोडी, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, संगमवाडी, ढोलेपाटील रोड, कल्याणीनगर हे भाग नदीच्या जवळच आहे. येथील नागरिक डासांमुळे हैराण झालेले असतानाच त्यांना अनेक आजारांचाही सामना करावा लागत आहे.
या परिसरातील डेंगी, मलेरिया, चिकुनगुन्या व हिवतापाच्या रुग्णाची संख्या वाढली आहे. आतापर्यंत पुण्यात डेंगीचे १६१ संशयित रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४७ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंत चिकुनगुनियाचे १७, तर टायफॉईडचे ९ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे ४ तर संसर्गजन्य हिपॅटायटिसचे ७ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५५
असून त्यातील ७४ जणांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन या नदीपात्राच्या स्वच्छतेकडे कधी लक्ष
देणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
जलपर्णीमुळे माश्यांचा प्रादुर्भाव
1महानगरपालिकेकडून भिडे पूल, सिद्धेश्वर पूल येथील जलपर्णी स्पायडर मशिनच्या साह्याने हटवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. खराडी पुलाजवळील जलपर्णी हटवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. याबाबत कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख कल्पना बळिवंत म्हणाल्या, ‘वाहून आलेल्या जलपर्णीवर डासांची पैदास होत नाही. जलपर्णीबरोबर वाहून आलेला कचरा, अन्नपदार्थ यामुळे डास, माश्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
2मशिनच्या साह्याने बहुतांश जलपर्णी हटवण्यात आल्या आहेत. या जलपर्णीवर आॅरगॅनिक स्प्रे मारल्यावर त्या आकसतात आणि विल्हेवाट लावली जाते. आपल्या भागातील नदी, नाले आदी ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आल्यास नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेशी संपर्क साधावा.’