ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:36 PM2021-07-15T20:36:00+5:302021-07-15T20:40:09+5:30
आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक...
आळंदी : आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरिता इंसिडेंट कमांडरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा पंढरपूर येथे भरते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना शासनाने निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने आषाढी यात्रेसाठी पुणे जिल्हयातून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, (श्रीक्षेत्र आळंदी देवाची), श्री. संत तुकाराम महाराज संस्थान (श्रीक्षेत्र देहू), श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान (श्रीक्षेत्र, सासवड), श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान (श्रीक्षेत्र, सासवड) या चार पालख्या आठ बसेसव्दारे प्रस्थान करणार आहेत. पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार अधिकाऱ्यांची इंसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.
नियुक्त इंसीडेंट कमांडर यांनी आषाढी यात्रा २०२१ च्या अनुषंगाने शासनाकडील व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील सुचनांनुसार पुणे जिल्हयातील मंजूर चार देवस्थानच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सर्व कार्यवाही इंसिडेंट कमांडर यांनी करायची आहे. संबंधीत उपविभागीय अधिकारी(इंसीडेंट कमांडर ) यांनी संस्थानांच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून पादूकांचा मार्ग निश्चित करुन याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी व सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून योग्य ते नियोजन करावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे.
नियुक्ती याप्रमाणे :
१) श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी - खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण.
२) श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू - हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर.
३) श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड - पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड.
४) श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड - पुरंदरचे नायब तहसिलदार उत्तम बढे.