जमिनीच्या वादातून घर पेटवले, खामगाव टेक-टळेकरवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 12:56 AM2018-11-04T00:56:20+5:302018-11-04T00:56:56+5:30
खामगाव टेक-टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पुनर्वसन जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत काठी, दगड व कु-हाडीच्या साह्याने झालेल्या मारहाणीत दोन पुरुषांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत.
उरुळी कांचन : खामगाव टेक-टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पुनर्वसन जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत काठी, दगड व कु-हाडीच्या साह्याने झालेल्या मारहाणीत दोन पुरुषांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. या वादात एका कुटुंबाचे घर व दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून देण्यासह घरासमोरील चारचाकी मोटार फोडण्याचा प्रकार शनिवार दुपारी २ च्या सुमारास घडला. या भांडणात बाहेरून गुंड बोलावून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
टिळेकरवाडी-खामगाव टेक (ता. हवेली) येथील गट क्र. ३११ मधील ७० गुंठे जमीन पुनर्वसन बाधित जमीन खरेदी कारणावरून बबन बाबूराव कादबाने व धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर यांच्या कुटुंबात वाद आहे. या जमिनीची खरेदी पुनर्वसिताकडून एका संबंधिताने केली आहे. या जमिनीवरील ताबा बबन कादबाने कुटुंबीयांकडे असल्याने या ताब्यावरून या दोन्ही कुटुंबांत अनेक वर्षांपासू वाद सुरू आहेत. या जमिनीवर कादबाने कुटुंबीयांकडून ऊस पीक घेण्यात आले आहे. या उसाच्या तोडणीचे काम सुरू असताना टिळेकर व कादबाने यांच्यात काल वाद सुरू झाला होता. तो कालच मिटला होता. मात्र, आज पुन्हा या वादाला तोंड फुटले व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. जमिनीचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातून बबन कादबाने व धर्मेंद्र टिळेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये दुपारी दोनच्या सुमारास वाद झाला. या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुटून पडून दगड, काठी व कुºहाडीच्या साह्याने हल्ला चढवून एकमेकांना जखमी केले आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीच्या हात व पायावर घाव घालण्यात आले आहेत. तर, दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा हल्ला घडल्यानंतर घटनेची खबर मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी रवाना करण्याबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता अचानक विवाद झालेल्या बबन कादबाने यांच्या घरावर पुन्हा हल्ला चढवून घराचे कुलूप तोडून पेट्रोलच्या साह्याने घरातील दोन खोल्या पेटवून देण्यात आल्या, घरासमोरील दुचाकी पेटवली व कारही फोडली.
या घराच्या अंगणात एकटा खेळत असलेल्या चार वर्षांच्या लहान बालकापुढे हा घर पेटविण्याचा प्रकार घडल्याने तो व हे कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. या घटनेत कादबाने कुटुंबीयांची मोठी अर्थिक हानी झाली आहे. दरम्यान, जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी बाहेरून गुंड बोलावून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. हा हल्ला घडल्यानंतर चार जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.