औंधमधील 'त्या' घटनेनंतर नागरिक भयभीत, पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले अन् दिले 'हे' आश्वासन...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:51 AM2024-06-20T10:51:00+5:302024-06-20T10:52:01+5:30
अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरवून खटला चालवण्यासाठी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी योग्य ती पाऊले उचलली जाणार - अमितेश कुमार
किरण शिंदे
पुणे: १३ जूनची पहाट.. ७७ वर्षाचे समीर रॉय चौधरी पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत घरी आलेच नाही.. औंधच्या परिहार चौकात दारुड्या टोळक्याने त्यांना अडवलं. दारू विकत घेण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र पैसे न दिल्याने त्यांना मारहाण केली. एकाने तर त्यांच्या डोक्यातच लोखंडी रॉडने वार केले. गंभीर जखमी झालेले समीर रॉय चौधरी कोमात गेले आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.. शांत आणि संयमी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिक पोलीस प्रशासना विरोधात आक्रमक झाले. औंध परिसरात कॅन्डल मार्च काढून नागरिकांनी समीर रॉय चौधरी यांना श्रद्धांजली वाहिली. या कॅन्डल मार्चमध्ये पोलीस यंत्रणा झोपली आहे का, आम्हाला सुरक्षेची हमी द्या असे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पहाटेच्या सुमारास मारहाण करून चोरीच्या घटना या नेहमीच घडत असतात.. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करतात असा आरोपही या नागरिकांनी केला.. नागरिकांचा वाढता रोष पाहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः औंध येथील रस्त्यावर उतरले.. ज्या ठिकाणी समीर रॉय चौधरी यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी भेट देत एक किलोमीटर परिसराची पायी चालत पाहणी केली. आणि त्यानंतर औंधमधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
नागरिकांशी संवाद साधताना अमितेश कुमार म्हणाले, या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व करू. अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरवून खटला चालवण्यासाठी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी किंवा त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात योग्य ती पाऊले उचलली जातील. विशेष सरकारी वकिलामार्फत फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात सर्व प्रयत्न आम्ही प्रयत्नशील आहोत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे करून चौधरी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आणि औंध परिसरातील शिस्त पुन्हा पूर्वीसारखी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
दरम्यान समीर रॉय चौधरी यांचा खून करणाऱ्या आरोपींपैकी चार जण हे अल्पवयीन आहेत. यातील दोन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच बाल न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती. त्यादिवशी या आरोपींनी रात्रभर दारूची पार्टी केली होती. दारू पिण्यासाठी त्यांना आणखीन पैसे हवे होते. आणि त्यासाठीच ते बाहेर पडले होते. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले समीर रॉय चौधरी त्यांच्या नजरेत पडले. या टोळक्याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र जवळ पैसे नसल्याने समीर रॉय चौधरी देऊ शकले नाही. आणि त्यामुळे आरोपींनी त्यांचा खून केला. या घटनेनंतर भयभीत झालेल्या औंध मधील नागरिकांची पोलीस आयुक्तांनी भेट घेतली.आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.