Pune: 'मसाप’च्या घटनेला मिळणार नवी झळाळी, घटना दुरूस्ती करण्याची शिफारस
By श्रीकिशन काळे | Published: March 18, 2024 05:13 PM2024-03-18T17:13:12+5:302024-03-18T17:13:52+5:30
घटनादुरुस्तीची चौथी बैठक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य परिषदेत झाली...
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनादुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याचा मसुदा एप्रिल -मे मध्ये होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठेवून त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्या घटनेस विशेष सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येईल, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. तरूणांना ‘मसाप’मध्ये संधी देण्यात येणार असून, त्यासाठी खास समिती असणार आहे.
घटनादुरुस्तीची चौथी बैठक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य परिषदेत झाली. समितीचे निमंत्रक रवींद्र बेडकिहाळ, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सदस्य विनोद कुलकर्णी, राजन लाखे यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ''या वर्षभरात घटना समितीच्या एकूण चार बैठका झाल्या. झपाट्याने बदलणाऱ्या काळाचे भान ठेवून घटना दुरुस्ती समितीने महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. संस्थेला आजवर कराव्या लागलेल्या अनेक अडचणींचा सामना आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा विचार करून घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे. परिषदेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ही घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरेल. काळाबरोबर संस्थेने बदलणे जसे गरजेचे आहे तसेच संस्थेची घटना दुरुस्त करणेही गरजेचे आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी उभी केलेली लोकचळवळ, मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासाठी घेतलेला पुढाकार, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी साहित्यिकांना सन्मानाने देण्यासाठी महामंडळाच्या घटना बदलासाठी घेतलेला पुढाकार, ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम, कालानुरूप परिषदेचे केलेले अंतर्गत नूतनीकरण, अक्षरधनसारखा सिद्ध केलेला संशोधन ग्रंथ या महत्त्वपूर्ण कामांबरोबरच घटना दुरुस्तीचे बहुप्रतिक्षित काम पूर्ण होत आहे याचे समाधान कार्यकारी मंडळाला आहे.
शिफारशींमुळे संस्थेला मिळणार नवे रूप
-कार्यकारी मंडळातील सदस्य व पदाधिकारी यांच्यासाठी निवृत्तीची वयोमर्यादा निश्चित
-विकेंद्रीकरणावर भर
-शाखेचे वाड्:मयीन कार्य, उपलब्ध मनुष्यबळ, निधी आणि जागा तसेच लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन परिषदेचे उपकेंद्र सुरु करण्यास मान्यता देण्याची शिफारस
-महाविद्यालयीन तरुणाई परिषदेशी जोडली जावी, त्यांच्यात संस्थात्मक कार्याची आवड निर्माण व्हावी त्यातून परिषदेला नवीन कार्यकर्ते मिळावेत यासाठी परिषदेची 'विद्यार्थी समिती' स्थापन करून तरुणांचा परिषदेतील सहभाग वाढविणार