पुण्यातील खळबळजनक घटना! दिवाळीत राहत्या घरातच दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:44 PM2021-11-07T18:44:09+5:302021-11-07T18:44:16+5:30
घरामध्ये केमिकलचे काही कॅन होते. तसेच गॅसही सुरु होता
पुणे : मुंढव्यातील केशवनगरमध्ये एका दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या घरामध्ये केमिकलचे काही कॅन होते. तसेच गॅसही सुरु होता. केमिकल रिॲक्शन होऊन मृत्यू झाल्याच्या शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला होता.
शरद भुजबळ (वय ४७, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि हेमा शरद भुजबळ (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शरद भुजबळ हे कॅब चालक आहेत. तर हेमा ही त्यांची दुसरी पत्नी आहे. हेमा या परिसरात धुणे भांड्यांची कामे करत होत्या. काही महिन्यांपूर्वीच ते दोघे भाड्याने रहाण्यास आले होते. त्यांचा घरमालकही त्यांच्या जवळच राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भुजबळ यांचा मित्र परवेज आलमची गाडी पंक्चर झाली होती. यामुळे तो शनिवारी त्यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधत होता. मात्र शरद यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे रविवारी शरद त्यांच्या घरी दाखल झाला. तेव्हा त्याला दोघेही मृतावस्थेत दिसले. तसेच घरातून गॅस व केमिकलचा वास येत होता. त्यांनी याची खबर पोलिसांना दिली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. घरातील गॅस तसेच टीव्ही सुरु होता. तसेच घरामध्ये मोठ्या प्रमाणात वायु साचल्याने दुर्गंधी झाली होती. त्यांच्या शेजारीही दोन्हीही घरे बंद आहेत. त्यांचा इतरांशी संपर्क नव्हता. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळून शकेल.
''घरामध्ये व्हेंटीलेशनसांठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. घरात गॅस सुरु होता तसेच केमिकलचे अनेक कॅन होते. यामुळे केमिकल रिॲक्शनमुळे मृत्यू झाल्याची शक्यता दाट आहे. केमिकलचे नमुनेही घेण्यात आले आहेत. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत असे मुंढवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.''