हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 04:49 PM2020-11-06T16:49:05+5:302020-11-06T17:53:03+5:30

एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा..

The incident in Shirur taluka is a disgrace to humanity; The question of law and order in the state is on the front : Praveen Darekar | हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

Next

पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? हाथरस रोज मुंबईसह महाराष्ट्रात घडतेय होतेय. परंतु हाथरसचे राजकारण करण्यात आल्याचे सांगत दरेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हाथरस प्रकरणी टीकेचे रान उठवण्याऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

    शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या नातेवाईकांची भेट घेत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. 

दरेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसात अशा घटना अनेक घडल्या आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. एखादा डोळा तरी पूर्ववत करावा, त्यासाठी मी स्वतः यंत्रणेशी संपर्कात राहणार आहे. एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा. तसेच काबाडकष्ट करूनपोट भरणारा परिवार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. पुण्यासाठी ही अशोभनीय घटना आहे. आमची मान शरमेने खाली जायला लावणारी ही घटना आहे असेही दरेकर म्हणाले. 

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाऊ नयेत आणि असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
कुटुंबाला सर्व मदत केली जाईल. डोळे पूर्ववत होण्याची शक्यता कमी दिसतेय. या महिलेचे पुढे योग्य पुनर्वसन करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल. माझ्या मतदारसंघातील घटना आहे. त्यामुळे सातत्याने मी आढावा घेत आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचे राजकारण आणू नये..

जखमी महिलेच्या पतीने सांगितले, आम्ही न्हावरे येथे गेली १५ वर्ष राहायला आहे. आमचा घरोघरी जावून भांडे विकण्याचा व्यवसाय आहे.त्यावर आमचे कुटुंब चालते. माझ्या दोन मुलींचे लग्न झाले असून दोन मुले लहान आहे. पण माझ्या पत्नीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेत तिचे डोळे काढण्यात आले. मला तुमचे धन दौलत काही नको आहे. फक्त माझ्या पत्नीचे डोळे परत यावे जेणेकरून मी तिच्यासोबत जगून शकेल. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

Web Title: The incident in Shirur taluka is a disgrace to humanity; The question of law and order in the state is on the front : Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.