भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हा प्रसंग आला नसता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:28+5:302021-08-28T04:16:28+5:30
पुणे : प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यात फिरण्यास सांगितले आहे. त्यांना फिरणं ...
पुणे : प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यात फिरण्यास सांगितले आहे. त्यांना फिरणं भाग असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह इतर मंत्री फिरत आहेत. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारले असता पवार म्हणाले, पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेली आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या. कायदा, नियम आहे. अटक केल्यानंतर कोर्टात आपले म्हणणे मांडता येते. कोर्टाला निर्णय देण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने शपथ घेतल्यानंतर भान ठेवून वागावे लागते. पदाची शपथ घेतल्यानंतर आपण जबाबदार शासक म्हणून काम करायला लागतो. त्यावेळी सर्व गोष्टींचे गांभीर्य घेऊन काम करावे लागते.’’