अवकाळीचा फटका
By admin | Published: May 18, 2014 11:38 PM2014-05-18T23:38:24+5:302014-05-18T23:38:24+5:30
जुन्नर शहर व परिसराला अवकाळी आज पुन्हा झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले.
जुन्नर : जुन्नर शहर व परिसराला अवकाळी आज पुन्हा झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तुटून पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. जुन्नर शहरात सुमारे दोन तास पाऊस झाल्याने आठवडे बाजारातील व्यापारी, छोटे-मोठे विक्रेते यांची धांदल उडाली व आहे ते जागेवर ठेवून त्यांना सुरक्षित जागेचा आश्रय घ्यावा लागला. मात्र, विक्रीसाठी आणलेल्या मालाचे नुकसान झाल्याने अनेकजण हतबल झाले. जुन्नर शहरातील शंकरपुरा पेठ या ठिकाणी असणार्या जुन्नर नगर परिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलनात तळातील व्यापारी गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्या ठिकाणीही व्यवसाय करणार्यांचे आर्थिक नुकसान झाले व गाळ्यांमध्ये घुसलेले पाणी काढण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. जुन्नर बस स्थानकातही पाणी घुसल्याने बस चालकास पावसाचे पाणी व गटारीचे पाणी लक्षात न आल्याने बस जुन्नर बसस्थानकातील बाहेरच्या रस्त्यालगत असणार्या गटारात अडकली. दौंड : दौंड शहर व परिसराला सायंकाळी जोरदार वादळाने झोडपले. हलक्या सरीही पडल्या. (वार्ताहर)