अवकाळीचा फटका
By admin | Published: February 28, 2015 11:19 PM2015-02-28T23:19:18+5:302015-02-28T23:19:18+5:30
सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या.
पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसाच्या सरी व दिवसभर असलेले ढगाळ वातावरण यामुळे हवामन बदलाचा शेतीपिकांवर परिणाम होणार असून, मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
शेतकऱ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी व कुरवंडी या सर्वच गावांत पावसाच्या सरिंनी हजेरी लावली. या भागातील ज्वारी पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, काढून झालेली ज्वारीची कणसे तसेच कडबा हा शेतातच होता. अचानक आलेल्या पावसाने ही ज्वारी तसेच कडबा पावसाने भिजणार आहे. शेतकऱ्यांनी या कडब्यावर तसेच कणसांवर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
ज्वारी पिकांबरोबरच सध्या या गावांमध्ये उन्हाळी बाजरी काढणी चालू असून, बाजरीची कणसे शेतातचच आहेत, ती पावसाने भिजू नये, तसेच शेतात साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांदा पावसाने भिजू नये, यासाठी कणसावर तसेच कांद्यावर झाकण टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. ज्वारीची कणसे काढून झाल्यानंतर ती उन्हात वाळवून मग त्याची मळणी केली जाते. मात्र, आता या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांची शेतातील ज्वारीची कणसे ही पावसाने भिजली असून, जोपर्यंत कडक ऊन पडत नाही तोपर्यंत या ज्वारीच्या कणसांची मळणी करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. एकंदरच अचानक आलेला पाऊस व ढगाळ हवामान यांमुळे शेतीपिकाच्या उत्पादनाला याचा चांगलाच फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अवकाळी फटक्यातून शेतकरी सावरला नसतानाच पुन्हा अवकाळी फेरा आला आहे. (वार्ताहर)
४सासवड : गेले आठवडाभर सासवडसह पुरंदरमध्ये तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आज (दि. २८) सायंकाळी सर्वत्र अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते व सायंकाळी ५ च्या सुमारास पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन किमान तापमान ११; तर कमाल तापमान २६.२ इतके नोंदण्यात आल्याचे आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव
यांनी सांगितले.
४सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस २ मि.मीटर नोंदला गेल्याचे यादव यांनी सांगितले .या पावसाने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने बळिराजा मात्र धास्तावला आहे. काढणीस आलेला कांदा, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना फटका बसणार आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजीर, डाळिंब व तत्सम फळझाडांना हानी पोचणार असल्याचे माळशिरसचे शेतकरी भास्कर यादव यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे हवेत
गारठा निर्माण झाला होता.
शेतकऱ्यांची धांदल
४दावडी : दावडी परिसरात हलक्या सरी व ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतातील हातातोंडाशी गहू, तांदळाची पिके काढण्याची शेतकऱ्यांची धांदल उडाली.
पिकांचे नुकसान
४खळद : पुरंदर तालुक्यात सासवड, खळद परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी या पावसाने आंब्याच्या मोहरासह अनेक पिकांना फटका बसला. याने शेतकरी हवालदील झाला आहे.
४ आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होते, तर हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. सध्या शेतात ज्वारी, हरभरा काढणीची कामे सुरू आहेत, तर अनेकांची वैरण, ज्वारीची कणसे, काढलेला हरभरा, कापलेला गहू शेतात पडून असल्याने अचानक पाऊस आल्याने पावसाने याचे नुकसान झाले, तर या वेळी शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली.
४ यंदा आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून, यालाही या अवकाळी पावसाचा फटका बसेल. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.