पुस्तकांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करा; प्रकाशकांची शासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:48 PM2020-04-29T19:48:06+5:302020-04-29T19:50:23+5:30
लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वच लोक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग व्हावा, सकारात्मक विचार पेरले जावेत यादृष्टीने पुस्तकांसारखा उत्तम मार्ग नाही.
पुणे : पुणे, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रकाशन व्यवसायाचा अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश करावा आणि पुस्तकांची दुकाने खुली करण्यास आणि पुस्तके घरपोच देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाशकांकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मराठी प्रकाशक संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वच लोक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग व्हावा, सकारात्मक विचार पेरले जावेत यादृष्टीने पुस्तकांसारखा उत्तम मार्ग नाही. पुस्तकांमध्ये ललित साहित्याबरोबरच शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्व विकास अशा अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. साहित्य समाजाचे मानसिक आरोग्य संतुलित राखण्यास मदत करते. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष अथवा इबुक, आॅडिओ बुक अशा कोणत्याही रुपात पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे पुस्तकांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून, त्यांची घरपोच सुविधा निर्माण करण्यास परवानगी द्यावी, असे मत प्रकाशकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
अनिल कुलकर्णी यांनी याबाबत वेगळे विचार मांडले. ते म्हणाले, 'रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुस्तक हा आवश्यक घटक असला तरी सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या नियमांचे पालन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रकाशकांनीही शासनाला सहकार्य करावे.'
----
पुस्तके खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग येतो. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून पुस्तक खरेदी होऊ शकते. सकारात्मक विचारांसाठी, विचारांना योग्य दिशा करण्यासाठी पुस्तके खूप महत्वाची आहेत. रेड झोनचा विचार करून पुस्तकांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देणे शक्य नसल्यास किमान कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पुस्तके घरपोच देण्यास परवानगी द्यावी. सुरक्षेचे सर्व नियम पाळून किमान कर्मचा?्यांमध्ये काम सुरू करता येईल.
- रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशन
----