लक्ष्मी रस्त्याचा मेट्रोत समावेश करा
By admin | Published: May 7, 2015 05:20 AM2015-05-07T05:20:33+5:302015-05-07T05:20:33+5:30
लक्ष्मी रस्ता, मंडई यांना टाळून मेट्रो काढणे योग्य नाही. लक्ष्मी रस्त्यावर २० हजार दुकाने आहेत. त्यामध्ये प्रत्येक दुकानात १० माणसे याप्रमाणे २ लाख लोक कामाला आहेत.
पुणे : लक्ष्मी रस्ता, मंडई यांना टाळून मेट्रो काढणे योग्य नाही. लक्ष्मी रस्त्यावर २० हजार दुकाने आहेत. त्यामध्ये प्रत्येक दुकानात १० माणसे याप्रमाणे २ लाख लोक कामाला आहेत. ते लक्ष्मी रस्त्यावर गाड्या लावून रस्त्यावरील पार्किंगची जागा घेतात. हेच लोक मेट्रोने आले तर ती जागा मोकळी राहील. याच परिसरात शाळा, शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, केळकर संग्रहालय अशी वारसास्थळे आहेत. त्यामुळे लक्ष्मी रस्त्याचा मेट्रोमध्ये अंतर्भाव करावा, अशी आमची स्पष्ट मागणी असल्याचे ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी सांगितले.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने टिळक स्मारक मंदिरात बुधवारी आयोजित वसंत व्याख्यानमालेत कै. अद्वैत बडवे स्मृति व्याख्यानात ‘पुणे मेट्रो’ या विषयावर फिरोदिया यांनी सोळावे पुष्प गुंफले. ते म्हणाले, ‘‘ मेट्रो आल्यानंतर एका कुटुंबामागे लाख ते दीड लाख रुपये इतकी गुंतवणूक आहे. ते सर्व पैसे सामान्यांच्या खिशातून जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोचा सखोल अभ्यास करायला हवा. वनाज ते रामवाडी (नगर रस्ता) या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे. कोथरुडवरुन दररोज ८५० बस सुटतात, त्यातील केवळ ३० बस नगर रस्त्याला जातात. मग वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग कसा असू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेट्रोला जास्त ग्राहक असणे आवश्यक आहे, तरच ती फायद्यात असेल. दिल्ली मेट्रोला शंभर कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. परंतु, हा तोटा केंद्र सरकार सहन करते. परंतु आपल्याकडे पुणे मेट्रो नावाने खासगी कंपनी असणार असून त्यामध्ये राज्य सरकार, महापालिका यांचा समावेश असेल. तसेच ५० ते ६० टक्के रक्कम ३० वर्षांकरिता कर्ज म्हणून घेणार आहोत. अशा परिस्थितीत मेट्रो फायद्यात राहायला हवी, तरच सामान्य पुणेकरांचा फायदा होईल.’’
मेट्रो पुणेकरांच्या माथी मारू नका
४मेट्रो मार्गावरील चटई क्षेत्र वाढवून तेथे जास्त लोकसंख्या करणे. जेणेकरुन या लोकांना मेट्रोशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच मेट्रो आल्यावर मुद्रांक शुल्क, मिळकत कर सरकार वाढवेल. याचा फटका सामान्य लोकांनाच बसणार आहे. त्यामुळे मेट्रो पुणेकरांच्या माथ्यावर मारू नका, सामान्य लोकांचे मत जाणून घ्या, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असे फिरोदिया यांनी सांगितले.