शासकीय महापुरुषांच्या अभिवादन यादीत संतांचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:14 AM2021-03-01T04:14:02+5:302021-03-01T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वारकरी संतांचे जन्मशताब्दी व समाधी शताब्दी वर्ष शासकीय वैभवात साजरे करण्याबरोबरच शासनाच्या महापुरुषांच्या अभिवादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वारकरी संतांचे जन्मशताब्दी व समाधी शताब्दी वर्ष शासकीय वैभवात साजरे करण्याबरोबरच शासनाच्या महापुरुषांच्या अभिवादन यादीत वारकरी संतांचा समावेश करावा, अशा मागण्या रविवारी (दि. २८) वारकरी सांप्रदायिकांच्या बैठकीमध्ये केल्या. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
दरवर्षी शासनाकडून महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी तारखांनुसार यादी प्रसिद्ध केली जाते. यंदाच्या यादीत सरकारने बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावांचा समावेश केला आहे. मात्र संतशिरोमणी नामदेव यांचे ७५० वे जयंती वर्ष सुरू असतानाही त्यांचे नाव वगळले आहे. या पार्श्वभूमीवर डेक्कन येथील खंडूजीबाबा मंदिरात वारकरी सांप्रदायिकांची बैठक पार पडली.
या बैठकीला ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार (आळंदी) राजाभाऊ चोपदार, श्रीसंत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज योगीराज गोसावी पैठणकर, सदगुरू अमृतानाथस्वामी महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर), संत तुकाराम महाराज संस्थानचे (देहू) प्रशांत मोरे देहूकर, संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग मोरे देहूकर, आम्ही वारकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार (आळंदी), कीर्तनकार सचिन पवार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समाजचे अध्यक्ष मारूती ज्ञानोबा कोकाटे यांच्यासह फडप्रमुख, दिंडीमालक आणि विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत संतांचे योगदान मोठे आहे. ‘संतभूमी’ अशी महाराष्ट्राची ओळख आहे. यंदाचे वर्ष हे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावतामाळी, संत सोपानकाका आणि संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. या संतांच्या समाधीचा सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सव आणि संत नामदेव यांचे ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सव शासनाने साजरा करावा या आमच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अशी विनंती शासनाकडे केल्याची माहिती कीर्तनकार सचिन पवार यांनी दिली.