समाविष्ट गावांचा पावसाळा ‘खड्ड्यात’ च जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:42 PM2018-06-27T13:42:16+5:302018-06-27T13:51:53+5:30
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही....
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने किमान १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना रस्त्यांसाठी केवळ ११ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे सध्या एका गावात केवळ एकाच रस्त्यांचे काम करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गावातील नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरुस्ती मागणी केली जात असताना निधीचे नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हात वर केले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. यात उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, मुंढवा, हडपसर, साडेसतरानळी आंबेगाव खुर्द, आंबेगाव बु्र., उंड्री, धायरी या गावांचा यामध्ये समावेश आहे. यातील बहुतेक सर्वच गावांची लोकसंख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे. मात्र, येथे अद्यापही अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वाढत्या लोकसंख्या व शहरीकरणामुळे गावांचा झपाट्याने विकास करण्यासाठी ग्रामपंचायतींची यंत्रणा अपूर्ण पडत होत्या. त्यामुळे आता गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने झपाट्याने विकास होईल अशी अपेक्षा होती. परंतु गावे महापालिकेच्या हद्दीत येऊन आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही गावांच्या विकासाकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नाही.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावांत सध्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साठून राहते. पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांची आणखी दुरावस्था होणार आहे. यामुळे अपघाची शक्यता देखील वाढली आहे. यामुळे या समाविष्ट गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ११ गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी किमान १०० ते १५० कोटी रुपयांच्या निधी आवश्यकता आहे. परंतु, महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी केवळ ११ कोटी अशी अत्यंत तुटपुंज्या निधीचीच तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनकडून सध्या एका गावात एकाच नवीन रस्त्यांच्या काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांची तात्पुरती डागडूजी करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांचा यंदाचा पावसाळा तरी खड्ड्यातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
----------------------
रस्त्यांसाठी निधीची गरज पण तरतूद कमी
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील रस्ते, फुटपाथ व रस्त्यासंदर्भातील अन्य लहान मोठ्या सुविधा पुरविण्यासाठी किमान २०० ते २५० कोटींच्या निधींची आवश्यकता आहे. त्यात तातडीच्या दुरुस्तीसाठी किमान १०० ते १५० कोटी रुपये लागतील. परंतु, महापालिकेने केलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक गावांत किमान एक नवीन रस्ता व तातडीने डागडुजी करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामुळे सध्या एका गावात रस्त्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.