ल्यूसी कुरियन यांचा १०० प्रतिभावान व्यक्तींमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 02:13 AM2018-12-16T02:13:37+5:302018-12-16T02:14:10+5:30
माहेर संस्थेतील मुलांमध्ये आनंदोत्सव : समाजकार्याची दखल घेतल्याची भावना
शिरूर : ‘वूम वर्ल्ड’ या मासिकाने निवडलेल्या या वर्षाच्या जगातील १०० प्रतिभावान व्यक्तींमध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्यूसी कुरियन यांचा समावेश झाल्याने माहेर संस्थेच्या येथील अनाथलयातील मुलांनी आनंदात्सव साजरा केला. वूम वर्ल्ड दरवर्षी जगातील १०० प्रतिभावान व्यक्ती निवडतात. या वर्षी निवडलेल्या व्यक्तींमध्ये सामाजिक कार्यकर्त्या कुरियन यांची निवड म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कामाची पावतीच आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे माहेर संस्थेची प्रमुख शाखा असून महाराष्ट्रासह तीन राज्यांत माहेरचे सामाजिक कार्य सुरू आहे. अनाथ, विधवा, परितक्ता, मनोरुग्ण, अविवाहित माता, ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्तींना ‘माहेर’चा आसरा मिळाला आहे. पदपथांवरील शेकडो व्यक्तींना स्वत: कुरियन यांनी गाडीत घेऊन संस्थेत दाखल केले आहे. अनेक अनाथ मुलींची माय बनून त्यांचे कन्यादान त्यांनी केलेले आहे. अनेक शोषित, पीडित महिलांचे अश्रू पुसताना त्यांना ‘माहेर’ची माया त्यांनी दिली आहे. उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, महिला बचतगट चळवळ यासारख्या त्यांच्या अद्वितीय सामाजिक कार्याची वूम मासिकाने दखल घेतली आहे. यामुळे माहेरच्या अनाथलयातील मुलांनी कुरियन यांचा फोटो जवळ घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
वूम १००च्या जागतिक प्रतिभावान व्यक्तींच्या यादीत चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेलो मॉर्केल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुटो, टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आदी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. जागतिक स्तरावरील या प्रतिभावान व्यक्तींबरोबर ल्यूसी कुरियन यांचाही समावेश झाल्याने माहेर परिवारात आनंदाचे वातावरण आहे.