मिळू शकते तेवढेच उत्पन्न

By admin | Published: June 13, 2014 05:08 AM2014-06-13T05:08:28+5:302014-06-13T05:08:28+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेला जकातीऐवजी सुरूकेलेल्या एलबीटीद्वारे ११०० कोटी रुपये मिळणे आवश्यक आहेत.

The income that can be obtained | मिळू शकते तेवढेच उत्पन्न

मिळू शकते तेवढेच उत्पन्न

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला जकातीऐवजी सुरूकेलेल्या एलबीटीद्वारे ११०० कोटी रुपये मिळणे आवश्यक आहेत. ही रक्कम एलबीटी रद्द करून मूळ विक्रीवर उलाढाल कर लावून जमा होऊ शकते. मालाच्या आयात खरेदीवर दोन टक्के प्रवेशकर आकारल्यास पालिकेला सुमारे १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रिज, कॉमर्स, सर्व्हिस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे आणि उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांनी केला आहे.
मुंबई येथील बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीबाबत महापालिकांनी स्थानिक व्यापारी संघटना, उद्योजक आणि संबंधितांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे. याबाबत अ‍ॅड. शिंदे आणि मित्तल यांनी महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन देऊन एलबीटी न राबवताही अपेक्षित उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते, याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.
आयुक्तांनी नोंदणीधारक व्यापाऱ्यांची संख्या आणि त्यांची मूळ विक्री याची आकडेवारी मागवून महापालिकेला ११०० कोटी रुपये मिळतील इतका कर लावावा. पिंपरी -चिंचवडमधून ४१८६ कोटी विक्रीकर मिळतो. याचा अर्थ येथील उलाढाल सुमारे ८३७२० कोटी रुपयांची आहे. उलाढालकराचा दर ०.०१४ इतका असावा. थोडक्यात शेकडा कर १.४० लावला, तर कोणतीही यंत्रणा न राबवता महापालिकेस १२०० कोटी हमखास मिळतील.
एलबीटी रद्द करून मूळ विक्रीवर उलाढाल कर आकारावा अशी मागणी आहे. या कराची आकारणी व्यापारी व उद्योजक बिलामध्ये करणार नाहीत. त्यामुळे खरेदीकराची वजावट येणार नाही. हा कर केवळ फायदा-तोट्याचा विचार न करता केवळ विकासासाठी देण्यासाठी ते तयार आहेत.
व्हॅट नोंदणीधारक मनपा हद्दीत आयात करतील त्या मालावर प्रवेशकर आकारावा. त्यामुळे व्यापारी व उद्योजक व्हॅटच्या विवरणपत्रासह विक्रीकर भरतानाच आयातीवरील प्रवेशकर मनपाच्या खात्यावर तिमाही किंवा सहामाही पद्धतीने भरतील. सध्या एकूण खरेदीपैकी मध्यम व मोठे उद्योग सुमारे ८० टक्के कच्चा माल आयात करतात. २० टक्के स्थानिक खरेदी असते. लघु उद्योजकांची आयात २० टक्के आणि स्थानिक खरेदी ८० टक्के असते. मूळ विक्री उलाढाल ८३७२० कोटींच्या ८० टक्के ६६९७६ कोटी खरेदी मोठे व मध्यम उद्योग करतात. त्यांपैकी ६०२७६ कोटी आयात खरेदी व ६७०० कोटी करमुक्त खरेदी होते. आयात खरेदीवर १.९९ म्हणजेच दोन टक्के प्रवेशकर लावल्यास १२०५ कोटींचे वार्षिक उत्पन्न हमखास मिळेल. दर वर्षी महागाईवाढीमुळे १० ते २० टक्के उत्पन्न वाढेल. (प्रतिनिधी)

Web Title: The income that can be obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.