‘ पीएमपी ’चे उत्पन्न अन् प्रवासीसंख्याही ठरेल विक्रमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 01:19 PM2020-02-11T13:19:53+5:302020-02-11T13:22:33+5:30
सोमवारी ‘बस डे ’ निमित्त प्रवाशांना अनपेक्षितपणे सुखद धक्का देत
पुणे : प्रवाशांना अनपेक्षितपणे सुखद धक्का देत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सोमवारी ‘बस डे ’ निमित्त विक्रमी १८३३ बस मार्गावर आणल्या. काही अपवाद वगळता प्रवाशांना नियमित वेळापत्रकानुसार बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवासीसंख्या आणि उत्पन्नातही विक्रमी कामगिरीचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पीएमपीच्या ताफ्यात मागील दोन वर्षांमध्ये नवीन बसची संख्या वाढली आहे. तसेच चालक व वाहकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने प्रशासनाने सोमवारी बस डे राबवित सर्वाधिक बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार किमान १७०० बस मार्गावर येतील, असा दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात सकाळच्या सत्रात १८०० हून अधिक बस मार्गावर आल्या. दररोज सुमारे १५०० ते १५५० बस मार्गावर येतात, तर नियमित शेड्यूल १७०० बसचे असते. पण बस डे निमित्त प्रशासनाने शेड्यूलपेक्षा १०० हून अधिक जादा बस मार्गावर आणल्याने विविध मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळाला.
........
दुपारपर्यंत साडेआठ लाख प्रवासी
‘पीएमपी’ला दुपारपर्यंत सुमारे साडेआठ लाख प्रवाशांनी प्रतिसाद दिला. इतर दिवशी हा आकडा सुमारे साडेसहा लाखएवढा असतो, तर दिवसभरातील एकूण उत्पन्न १ कोटी ५० लाख ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाते. बस डेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दररोजचे एकूण प्रवासी ११ ते १२ लाख एवढे असतात. बस डेमुळे हा आकडा १३ ते १४ लाखांवर जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
.........
आता ९ मार्चला बस डे
नियमित शेड्यूलपेक्षा जास्त बस मार्गावर आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्यात बस डे राबविला जाईल. यापुढील बस डे दि. ९ मार्च रोजी होईल. अधिकाधिक बस मार्गावर आणून प्रवाशांना चांगली सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे. यापुढे बस डेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. बसचा नागरिकांनी वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.
.......
बस डे’ची स्थिती
एकूण शेड्यूल - १७०३
प्रत्यक्ष मार्गावरील बस १८३३
इतर दिवशीपेक्षा जास्त बस - सुमारे ३००
पीएमपी मालकीच्या - १३६७
भाडेतत्त्वावरील - ४६६
उत्पन्न (दुपारी ३ पर्यंत) - तिकीट विक्री - ७४,५१,७६३
पास विक्री - २५,७४,५४८
दिवसभराचे अपेक्षित उत्पन्न - १ कोटी ९० लाख ते २ कोटी
दिवसभराची अपेक्षित प्रवासीसंख्या - १३ ते १४ लाख
...........................
इतर दिवशी
दैनंदिन बस - १४५० ते १५५०
उत्पन्न - १ कोटी ६० लाख
प्रवासीसंख्या - ११ ते १२ लाख
.............