पुणेकरांच्या बेफिकिरीमुळे तिजोरीत ४४ कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:08+5:302021-09-19T04:12:08+5:30
मुंबईनंतर पुण्यातील नागरिक अधिक, लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये व कोरोनापासून आपले स्वतःचे रक्षण व्हावे, ...
मुंबईनंतर पुण्यातील नागरिक अधिक,
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये व कोरोनापासून आपले स्वतःचे रक्षण व्हावे, यासाठी लसीकरणानंतर देखील सर्वांनी शंभर टक्के मास्क वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. त्यानंतर देखील अनेक महाभाग हे मास्क न वापरात बेफिकीरपणे सार्वजनिक फिरत असतात. अशा बेफिकीरपणे फिरणाऱ्या ९ लाख ७६ हजार पुणेकरांकडून गेल्या दीड वर्षांत तब्बल ४४ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे.
राज्यात मुंबई, पुण्यासह बहुतेक सर्व मोठ्या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, मुंबई, पुण्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. शासनाने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी शंभर टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला जातो. पुणे जिल्ह्यात महापालिका, पोलीस, ग्रामीण पोलीस, नगरपालिका यांच्याकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते. परंतु, कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिक अधिक बेफिकीर झाले असून, मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. यामुळेच एका आठवड्यात तब्बल २० लाखांपेक्षा अधिक दंड वसुली करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत ४४ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये गोळा केले आहेत. यामध्ये पोलिसांकडून सर्वाधिक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात पुणे शहर आणि ग्रामीण भागात कारवाई झालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
-------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेली कारवाई
लोकसंख्या : 976286
वसूल दंड : 447588643
--------
गणेशोत्सवाच्या आठ दिवसांत झालेली कारवाई
लोकसंख्या : 4574
वसूल दंड : 2095950