मिळकत कर विभाग कॅशलेस
By admin | Published: May 18, 2017 06:05 AM2017-05-18T06:05:10+5:302017-05-18T06:05:10+5:30
केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारांना पुणेकरांनी सर्वाधिक प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागातील वसुलीवरून तरी तसेच दिसते
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारांना पुणेकरांनी सर्वाधिक प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागातील वसुलीवरून तरी तसेच दिसते आहे. या विभागाच्या आतापर्यंतच्या ३०४ कोटी रुपयांच्या वसुलीपैकी फक्त २२ टक्के वसुली रोख म्हणजे नोटांच्या स्वरूपात झाली आहे.
मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. या विभागाच्या वतीने नागरिकांनी आपला कर आॅनलाईन जमा करावा, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला चांगले यश मिळते आहे, असे मापारी यांनी सांगितले.
आॅनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे, असे मापारी यांनी सांगितले. धनादेशाच्या स्वरूपात जमा झालेला कर लक्षात घेतला तर कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण तब्बल ७८ टक्के झाले आहे, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारेही कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा नाही. त्यात काही तांत्रिक स्वरुपाच्या अडचणी आहेत. प्रामुख्याने बँकेतून कर जमा झाल्यानंतर संबंधिताला त्याच्या मोबाईलवर कर जमा झाल्याचा संदेश कसा मिळेल, याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मापारी यांनी सांगितले. शहरातील किराणा मालाच्या दुकानांमधूनही मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा एका कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, मात्र यात संबंधितांना कमीशन म्हणून अगदीच कमी रक्कम मिळणार आहे. तसेच वर्षातून एकदाच हा व्यवहार होईल. त्यामुळे या योजनेला कमी प्रतिसाद मिळत आहे.
आॅनलाईन प्रशिक्षणाचा प्रयत्न
महापालिकेच्या वतीने आॅनलाईन व्यवहाराचे नागरिकांना प्रशिक्षण देता येईल का, याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मापारी यांनी दिली. यंत्राद्वारे मतदान करण्याबाबत जसे मतदारांना प्रशिक्षण देण्यात येते त्याचप्रमाणे नागरिकांना ते रोख स्वरूपात पैसे जमा करण्यास आले, की तिथेच त्यांना आॅनलाईन प्रशिक्षण देता येईल का, त्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करता येतील का, याचा विचार मिळकत कर विभाग करीत आहे.