प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ दिवसभर ‘हँग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:19 AM2017-08-01T04:19:41+5:302017-08-01T04:19:41+5:30
प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदल उडाली होती. मात्र, प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे विवरण भरण्याची प्रक्रियाच कोलमडली होती.
पुणे : प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदल उडाली होती. मात्र, प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे विवरण भरण्याची प्रक्रियाच कोलमडली होती.
अनेकांनी आॅनलाईन विवरण भरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी सीएंना आपले विवरण भरण्यास सांगितले होते. देशभरामधून संकेतस्थळावर अनेकांनी प्रयत्न केल्याने सर्व्हरवर ताण आला होता. संध्याकाळपर्यंत हे संकेतस्थळ डाऊन असल्यामुळे नागरिक विवरण भरु शकले नाहीत. विवरण भरण्याची मुदत ५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अर्थ मंत्रालयाने प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैची मुदत दिली होती. यंदा विवरण दाखल करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, शहरातील आधार कार्ड केंद्र बंद असल्याने आणि सुरु असलेल्या केंद्रांवरील सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना वेळेत आधार काढून घेता आले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत विवरण भरण्यासाठी धावपळ सुरु होती.
विशेष म्हणजे केंद्र शासनाने ही मुदत वाढवून दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. एरवी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष उभा करुन विवरण दाखल करुन घेतले जाते. मात्र, अलिकडील काळामध्ये आॅनलाईन रिटर्न्स भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे करदाते वैयक्तिक विवरण स्वत:च दाखल करतात. यासोबतच सीएंकडून आपले विवरण दाखल करुन घेतात. पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याच्याही सुचना प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना देण्यात आलेल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ व्यवस्थित चालत होते. मात्र, दहा वाजता संकेतस्थळ डाऊन झाले.