मिळकतकर सवलत ‘आॅफलाईन’
By Admin | Published: January 6, 2017 07:08 AM2017-01-06T07:08:26+5:302017-01-06T07:08:26+5:30
आयटी उद्योगाला निवासी दराने मिळकतकराची आकारणी करण्यास मंजुरी देणाऱ्या पालिका सभागृहाने आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांना मिळकतकरामध्ये ५ टक्के
पुणे : आयटी उद्योगाला निवासी दराने मिळकतकराची आकारणी करण्यास मंजुरी देणाऱ्या पालिका सभागृहाने आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांना मिळकतकरामध्ये ५ टक्के सवलत देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मात्र फेटाळून लावला. सत्ताधारी राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाचा प्रस्तावाला पाठिंबा होता, तर काँग्रेस व मनसेने त्याला तीव्र विरोध केला.
केंद्र सरकारच्या कॅशलेस धोरणाला पाठिंबा म्हणून अशी सवलत जाहीर करण्यात येत आहे का, असा सवाल काँग्रेस-मनसेने केला. त्यांच्या विरोधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंब्यातील रस
काढून घेतला. त्यामुळे हा
प्रस्ताव थेट मार्च २०१७च्या
म्हणजे निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या नव्या सभागृहापुढे चर्चेसाठी येईल.
प्रामाणिकपणे कर भरणारे सोडून अन्य सर्व घटकांना करामध्ये सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे का, अशी विचारणा अविनाश बागवे यांनी केली. आबा बागुल यांनी यामुळे पालिकेला किती रकमेवर पाणी सोडावे लागेल, याचा अंदाजही न देता प्रशासनाने
प्रस्ताव ठेवला असल्याबद्धल टीका केली.
काँग्रेसचे अरविंद शिंदे, बागुल, मनसेचे किशोर शिंदे, राजेंद्र वागसकर यांनी याला तीव्र विरोध केला. अशोक येनपुरे यांनी सवलतीची टक्केवारी कमी करावी, असे सुचवून नंतर प्रस्ताव मंजूर करा, असे सांगितले. भाजपाचे सदस्य तसेच राष्ट्रवादीचे सभागृहनेते बंडू केमसे त्यांना विरोध करू नका, असे सांगत होते.
आयुक्त कुणाल कुमार हेही प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आग्रही होते. मात्र, अशी सवलत का
द्यायची, अशी विचारणा
करीत काँग्रेस, मनसेने आपला
विरोध कायम ठेवला. अखेर हा प्रस्ताव मार्च २०१७मध्ये घेण्याचा निर्णय झाला.
(प्रतिनिधी)