मिळकत कर ४० कोटींनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2016 01:39 AM2016-07-01T01:39:39+5:302016-07-01T01:39:39+5:30
महापालिकेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच मिळकत कराची सवलत योजना ३० जूनपर्यंत वाढविली होती
पुणे : महापालिकेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच मिळकत कराची सवलत योजना ३० जूनपर्यंत वाढविली होती, त्याचा चांगला फायदा पालिकेला झाला असून, पालिकेला त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ४० कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. जुलै महिन्यापासून मिळकत करावर दर महिना २ टक्के दंड पालिकेकडून आकारला जाणार आहे.
शहरात ८ लाख मिळकतीधारक आहेत. वेगवेगळ्या कारणांनी अनेक मिळकतींची थकबाकी राहिलेली होती. मागील वर्षी प्रशासनाने अभय योजना राबवून ही थकबाकी वसूल करण्यात मोठे यश मिळविले. त्यापाठोपाठ यंदा मिळकत कराची चांगली वसुली करण्यात प्रशासनाल यश आले आहे. त्यासाठी नागरिकांना पोस्टाने घरपोच बिले पाठविणे, आॅनलाइन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा दीड लाख मिळकतधारकांनी आॅनलाइन कर भरलेला आहे. एकूण ८ लाख मिळकत- धारकांपैकी साडेपाच लाख मिळकतधारकांनी भरणा केला आहे. उर्वरित अडीच लाख धारकांना जुलै महिन्यापासून दंड आकारला जाणार आहे.
>पालिका प्रशासनाला यश
महापालिकेच्या वतीने पूर्वी सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली जात होती, यंदा ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. मागील वर्षी ३० जूनपर्यंत ५६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ३० जूनपर्यंत ६०० कोटींचा पल्ला गाठण्यास पालिका प्रशासनास यश आले आहे.