प्राप्तिकर अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:19 PM2018-12-04T23:19:22+5:302018-12-04T23:19:33+5:30
बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले.
पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले.
गुलटेकडी येथील बोधी टॉवर्स इमारतीत प्राप्तिकर विभागाचे कार्यालय आहे.
शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीवर असलेला कर काही प्रमाणात कमी करायचा होता. याबाबत त्याने प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. कर कमी करून देणे तसेच बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याने त्याच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
मंगळवारी रात्री बोधी टॉवर्स इमारतीतील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा लावून अधिकाऱ्याला पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.