अमनोरा पार्कचे देशपांडे IT च्या रडारवर, सकाळ-सकाळ १४ गाड्यांतून आले अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:07 AM2023-02-16T06:07:19+5:302023-02-16T06:09:24+5:30
शरद पवार यांच्या निकटवर्तीयावर पुणे, रोहा येथे एकाच वेळी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून बांधकाम व्यावसायिक आणि सिटी काॅर्पोरेशनचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली. उद्योजक देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अविनाश भोसले यांच्या पाठोपाठ पुण्यातीलच एका बड्या व्यावसायिकावर कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळातही या खळबळ उडाली. याशिवाय रोहाजवळील केळतवाडी येथील घरीही पथक धडकले होते. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
देशपांडे यांची सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्त्यावर आहे, तसेच हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात एक कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे प्राप्तिकरच्या पथकांनी ताब्यात घेतली आहेत.
१४ वाहनांतून आले पथक
रोहा (जि. रायगड) : शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळतवाडी येथे अनिरुद्ध देशपांडे यांची शेकडो एकर मालमत्ता आहे, केलजाई इको रिझर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही त्याचाच एक भाग आहे. या ठिकाणी सकाळी सुमारे १४ वाहनांतून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा आला. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात व घरावर एकाच वेळी छापेमारी केली. मुख्य प्रवेशद्वार बंद करून कोणालाही बाहेर जाण्यास मनाई केली होती.
मुंबई आणि दिल्ली येथून आलेल्या प्राप्तिकरच्या पथकांनी सकाळपासूनच एकाच वेळी पुणे तसेच रोहा येथे कारवाईला सुरुवात केली. पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने जप्त केली.
अमोनोरा पार्कमुळे आले प्रसिद्धीला!
n ३० वर्षांपासून देशपांडे
हे बांधकाम क्षेत्रात आहेत. अमोनोरा पार्क ही अत्याधुनिक सॅटेलाइट सिटी असून तिचा खूप बोलबाला झाला.
n सिटी कॉर्पोरेशनमध्ये ६ संचालक आहेत. बांधकाम व्यवसाय क्षेत्राशिवाय सॉफ्टवेअर, मनोरंजन आदी क्षेत्राशी देशपांडे संबंधित आहेत.
n देशपांडे यांनी खेळांशी संबंधित संस्था स्थापन केल्या असून, ते क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कार रेसिंग, कुस्ती आदी खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात.