‘कोविड वॉररूम’मध्ये येणारे कॉल दहा पटीने झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:02+5:302021-05-17T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या ‘कोविड-१९ वॉर रूम’ मध्ये कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात बेड मिळावा, याकरिता एप्रिल महिन्याअखेरपर्यंत दिवसाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या ‘कोविड-१९ वॉर रूम’ मध्ये कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात बेड मिळावा, याकरिता एप्रिल महिन्याअखेरपर्यंत दिवसाला साधारणत: दीड हजार कॉल (दूरध्वनी) येत होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून वॉररूमध्ये एप्रिलच्या तुलनेत दहा पटीने कॉल कमी झाले आहेत़
शनिवारी दिवसभरात १०० च्या आतच वॉररूममध्ये कॉल करून नागरिकांनी बेडबाबत व होम आयसोलेशनमधील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराबाबत चौकशी केली आहे़
उच्च न्यायालयातून महापालिकेच्या ‘कोविड-१९ वॉररूम’मध्ये बेडची उपलब्धता तपासण्यासाठी कॉल आल्यावर बेड नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे महापालिकेची मोठी नाचक्की झाली होती. परिणामी, संबंधित महिला शिक्षिकेला निलंबितही केले. आता महापालिकेच्या ‘कोविड-१९ वॉर रूम’मध्ये एकही शिक्षक नियुक्तीस ठेवला नसून, वॉररूमचे सर्व काम ‘आय हील वेल’ या खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीचे ५३ जण तीन शिफ्टमध्ये येत काम करीत आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये एक व्यवस्थापकही कंपनीने नियुक्त केला आहे. तर महापालिकेनेही वॉररूमकरिता सहा कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये दोन जण येथे कार्यरत आहेत.
वॉररूममध्ये एप्रिलपर्यंत दिवसाला साधारणत: दीड हजार कॉल येत होते. परंतु, हे प्रमाण आता दहा पटीने कमी झाल्याने, वॉररूममधील इंटरकॉमच्या चार लाईनही कमी केल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४ मार्चपासून या वॉररूममध्ये ३२ हजार ८१८ जणांनी कॉल केले होते. यापैकी ७ हजार ५०० हून अधिक जणांना विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून दिले़
सद्यस्थितीला शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने, शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. सध्या केवळ व्हेंटिलेटर बेड व आयसीयू बेडसाठी तथा होम आयसोलेशनमधील रुग्णांचे महापालिकेच्या वॉररूममध्ये कॉल येत असून, या सर्वांची नोंद प्रथम घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील सूचना वॉररूममधील कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात असल्याची माहिती वॉररूमचे प्रमुख डॉ. रूपेश अग्रवाल यांनी दिली़
फोटो : कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात बेड मिळण्यासाठी मार्गदर्शन महापालिकेच्या ‘कोविड-१९ वॉररूम’मधून करण्यात येत आहे.