पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:20 PM2017-12-09T12:20:10+5:302017-12-09T12:31:02+5:30

वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे

incomplete action by RTO of Pune; Dealers' dealership without registration | पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट

पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट

Next
ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांत ७१३ विनानोंदणी क्रमांकाच्या वाहनांवर आरटीओने केली कारवाईनोंदणी क्रमांक नसलेल्या सरासरी दरमहा ३० ते ४५ वाहनांवर कारवाई

विशाल शिर्के । 
पुणे : वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत ७१३ विनानोंदणी क्रमांकाच्या वाहनांवर आरटीओने कारवाई केली असून, त्यातील अवघ्या चार वाहन वितरकांवर कारवाईचे धाडस दाखविले आहे. 
कायमस्वरूपी वाहन नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कोणत्याही वाहन वितरकांना ग्राहकांना वाहन देता येत नाही. अनेकदा अशी वाहने रस्त्यावरुन सर्रास फिरताना आढळतात. अशा वाहनांचा वापर एखाद्या गुन्ह्यात झाल्यास त्याचा तपास लावणे जिकिरीचे होऊ शकते. तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनदेखील असे वाहन चालविणे चुकीचे आहे. अशा वाहनांचा अपघात झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनींकडून मिळत नाही. केंद्रीय मोटार वाहन नियमानुुसार असे वाहन चालविणे दंडनीय अपराध आहेत. विना क्रमांक दुचाकी चालविल्यास १ हजार, तर मोटार कार चालविल्यास २ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच वाहन वितरकाने नोंदणी क्रमांकाशिवाय वाहनाचे वितरण केल्यास त्यांच्यावरही परवाना निलंबानाची कारवाई करण्यात येते. 
प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशी नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येते. सरासरी दरमहा ३० ते ४५ वाहनांवर कारवाई केली जात असल्याची नोंद आरटीओकडे झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ४०७ आणि जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ३०७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना आरटीओने केवळ वाहनचालकांवरच कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा वाहनांचे वितरण करणाऱ्या वाहन वितरकांवर औषधापुरतीदेखील कारवाई झाली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़.

नोंदणी क्रमांक नसणाऱ्या वाहनांवरील कारवाई 
२०१६    २०१७

महिना           संख्या         महिना    संख्या
एप्रिल           ७८            जानेवारी    ५६
मे                 ४७            फेब्रुवारी     २७
जून              ९३            मार्च           १९
जुलै              ४५            एप्रिल        ३९
आॅगस्ट        १२            मे              २५
सप्टेंबर        ५३            जून            ३१
आॅक्टोबर     ३२            जुलै            ४४
नोव्हेंबर       २८             आॅगस्ट     ३८
डिसेंबर         १९            सप्टेंबर      ३७

गेल्या दोन वर्षांत अवघ्या ४ वाहन वितरकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ही प्रकरणेदेखील जून २०१७ नंतरची आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी ही माहिती उघड केली आहे. 
 

Web Title: incomplete action by RTO of Pune; Dealers' dealership without registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.