उद्यानातील अपूर्ण कामे सुरू
By Admin | Published: January 11, 2017 03:07 AM2017-01-11T03:07:50+5:302017-01-11T03:07:50+5:30
निगडी-प्राधिकरणातील नऊ एकर परिसर असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत
रावेत : निगडी-प्राधिकरणातील नऊ एकर परिसर असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे निधी मंजुरी असूनसुद्धा कामे पूर्ण केव्हा होणार, याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दाखल घेऊन पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी स्थायी समितीमध्ये प्राधिकरण परिसरातील पेठ क्रमांक २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाकरिता संरक्षण भिंत व इतर कामाकरिता अंदाजे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. चांगल्या असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाकरिता अनेक नागरिकांनी त्या वेळेस विरोधही दर्शविला. परंतु संरक्षण भिंतीचे काम तार न लावता आटोपण्यात आले होते. त्यामुळे भिंतीवरून सहज उद्यानात प्रवेश करता येतो. छोट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली होती. प्रसाधनगृहातील नळ, प्लॅस्टिक पाईप यांची तीनदा चोरी झाली होती.
शहरातील एकमेव नक्षत्रवाटिकेतील आयुर्वेदिक झाडांना धोका निर्माण झाला होता. तसेच स्वागत कमानसुद्धा अर्धवट अवस्थेत होती. गेले अनेक महिने काम ‘जैसे थे’ होते. स्थापत्य विभागाने या वृत्ताची दाखल घेऊन अर्धवट कामाला सुरुवात केली आहे. उद्यानाची देखभाल चांगली आहे. लॉन हिरवळ , छाटनी योग्य आहे, परंतु मातीअभावी अनेक ठिकाणी हिरवळ अर्धवट अवस्थेत आहे, छोट्या वृक्षांची वाढ खुंटली आहे. उद्यानाला कमीत कमी २० ट्रक मातीची आवश्यकता आहे.
झाडांच्या पोषणाकरिता हिवाळ्यामध्येच माती टाकणे उद्यानाकरिता गरजेचे आहे. आता गणेश तलाव सप्लाय स्टॅन्ड बाय पाणी मोटर, झाकण असलेली २० डस्ट बिन, नवीन फायबर विद्युत दिवे, संत ज्ञानेश्वर म्युरल (ज्ञानेश्वरी ग्रंथासोबत), बसण्यासाठी नवीन बाक ही उरलेली कामे प्रतीक्षेत आहेत. ही कामेसुद्धा लवकरात लवकर पूर्ण केली जातील, अशी ग्वाही पालिका स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता कांबळे यांनी दिली आहे. (वार्ताहर)