विजेअभावी कांदालागवड खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:41 AM2018-10-05T01:41:48+5:302018-10-05T01:42:15+5:30
रब्बी हंगाम : नित्याचे आठ तास भारनियमन; त्यानंतरही लपंडाव
शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामातील आर्थिक उत्पन्नाचा हुकमी एक्का अर्थात कांदालागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, लागवडीदरम्यान अधूनमधून वारंवार खंडित होणाऱ्या विजेअभावी कांदालागवडीची कामे खोळंबली आहेत. विजेचे झटके शेतकºयांना सहन करून लागवडीची कामे मार्गी लावावी लागत असल्याने लागवडीच्या काळात विद्युत महामंडळाने अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.
चालू वर्षी पावसाळी हंगामातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत अल्प प्रमाणात वरुणराजाची कृपा झाल्याने पाण्याचे संकट निर्माण होऊ लागले होते. रब्बीतील कांदापीक शेतकºयांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. कांद्याच्या उत्पादनावर बळीराजाचे वार्षिक अर्थनियोजन अवलंबून असते. मात्र, यंदा
पावसाने दीर्घ काळ ओढ दिल्याने पाणीस्रोतांची पातळी खालावली आहे. परिणामी, कांदालागवडीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात परतीच्या मुसळधार वळवाच्या पावसाची कृपा होऊ लागल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या कांद्याची रोपे लागवडीसाठी परिपक्व होऊन लागवडीलायक झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर, यांत्रिक अवजारांच्या साह्याने शेतकरी जमिनींची मशागत करून ती लागवडयोग्य बनवून रब्बीची कामे हाती घेत आहेत. कांदालागवडीच्या कामांना मजुरांची टंचाई प्रकर्षाने जाणवत असून, लागवडीसाठी परगावाहून मजूर बोलवावे लागत आहेत. परिणामी, शेतकºयांना मजुरांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आर्थिक झळ सोसून सुरू असलेल्या लागवडीदरम्यान वीज गायब होत असल्याने मजुरांना बसवून ठेवण्याची वेळ आली आहे.
कांदारोपे उपलब्ध...
चालू वर्षीच्या रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या रोपांचा तुटवडा जाणवत नसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होऊ लागली आहे. खेड तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षीच्या रब्बी हंगामाच्या शेवटी-शेवटी कांद्याच्या बियाण्यांसाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गोठाची लागवड केली होती. हवामानाने साथ दिल्याने त्यापासून बियाण्यांचे उत्पादन मिळविण्यात शेतकºयांनाही यश मिळाल्याने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात रोपांची टाकणी झालेली आहे. परिणामी, कांदालागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यास अधिक मदत होत आहे.
चासकमान धरणातील पाण्याचा फायदा...
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला नेहमीच चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याचा फायदा होतो. चालू वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने कृपा केल्याने चासकमान धरण १०० टक्के भरले आहे. जीवनदायिनी पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.