पालखीला पालिकेकडूनच ‘गैरसोय’
By admin | Published: June 22, 2017 06:56 AM2017-06-22T06:56:33+5:302017-06-22T06:56:33+5:30
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती, असा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमधून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.
वारकऱ्यांसाठी ना प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती, ना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मांडवही घालण्यात आलेले नसल्याचे सांगून महापौर काहीही ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र विरोधी पक्षाची भाषा चुकीची असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीवर लक्ष वेधून महापौर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभात्यागाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. वारकऱ्यांना प्यायला
पाणी नव्हते, औषधोपचार मिळाले नाहीत. पूर्वी शहरात १५० मांडव टाकण्यात येत असत,
या वेळी केवळ ९० मांडव टाकण्यात आल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वसाधारण सभेत महापौरांनी या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गेल्या ६० वर्षांत वारकऱ्यांची पहिल्यांदाच एवढी गैरसोय झाली असून, १५ वर्षांपासून महापालिकेत असलेल्या भाजपा सदस्यांना वारकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा द्यायच्या, याची माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पेठ, भवानी पेठेत वारकऱ्यांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागला, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले.