तुटलेल्या रस्त्याचे काम न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:18+5:302021-09-21T04:11:18+5:30
२१ व २२ अतिवृष्टीत डोंगराचे भाग कोसळून शेती, जमीन, ताली झाडांसह वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या भागातील ...
२१ व २२ अतिवृष्टीत डोंगराचे भाग कोसळून शेती, जमीन, ताली झाडांसह वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या भागातील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यातील काहींचे जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली असली, तरी नीरा देवघर रिंग रोडवरील शेवच्या टोकाची असणाऱ्या कुडली खुर्द, कुडली बुद्रुक, मानटवस्ती, दुर्गाडी, अभेपुरी, चौधरीवाडी येथील ग्रामस्थांना आजही यातना सहन कराव्या लागत आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले होते. रस्त्यावर आलेल्या दरडी बाजूला करण्याचे काम केले गेले. त्यामुळे कुडली खुर्दपर्यंत लहान वाहने जाऊ शकतात. परंतु कुडली खुर्द आणि कुडली बुद्रुकच्या दरम्यान पूर्ण तुटून गेलेल्या रस्त्यामुळे तसेच रस्त्याच्या मोरीची तूट झाल्याने पुढील गावांना जाणारा मार्ग आजही बंद आहे. आज गेली दोन महिन्यांपासून याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. या भागातील नागरिकांना आजही दळणवळणाची सोय नाही. येथील शाळेतील मुले यांना शाळेत जाण्यासाठी रस्त्या अभावी वाहन व्यवस्था नाही.तसेच लहान मुले -वृद्ध यांना दवाखान्यात जाताना मोठी गैरसोय होत आहे. रेशनिंग व बाजारहाट आणताना ग्रामस्थांची कसरत होत आहे.
खासगी वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच किमी पायपीट करावी लागत आहे. पायपीट कमी होण्यासाठी कुडली खुर्दपर्यंत एसटी बस चालू व्हावी, तसेच मुक्कामी बसबरोबर दुपारची बसही चालू करावी अशी मागणीही कुडली ग्रामस्थ करीत आहेत. शिरगावमार्गे असणाऱ्या रस्त्याने अंतर व वेळ जास्त लागत असला, तरी कुढली व दुर्गाडी दरम्यान रस्त्यावर भेगा पडल्याने हा मार्ग ही धोकादायक आहे. त्यामुळे वरची कुडलीकरांची अवस्था ‘इकडे आड- तिकडे विहीर’ अशी झाली आहे. येथील ग्रामस्थांचे दळणवळणासाठी दोन्ही कुडली व कुडली दरम्यान च्या रस्त्याची दुरुस्ती अथवा तात्पुरत्या स्वरुपात जेसीबी मशीनच्या साह्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
शिरवली येथे आरोग्य उपकेंद्र असल्याने दवाखान्यात जाण्यासाठी ६/७ किमी पायपीट करावी लागते. त्यात आजारी मुले - वृद्धांना घेऊन जाताना गैरसोय होत आहे.
लक्ष्मण हिरवे, सरपंच- दुर्गाडी
रस्ताच्या गैरसोयीमुळे वाहतूक बंद असल्याने आठवीच्या पुढील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कुडली येथील तुटलेल्या रस्त्याच्या जागी चारचाकी गाडी जाईल, असा मार्ग प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण उपलब्ध करून द्यावा.
अंकुश कंक,नामदेव पोळ, ग्रामस्थ- कुडली