वीज भरणा केंद्रात गैरसोयींचा ‘शॉक’

By admin | Published: April 12, 2016 04:30 AM2016-04-12T04:30:06+5:302016-04-12T04:30:06+5:30

शहरातील साडेपाच लाख वीज ग्राहक दर महिन्यास कोट्यवधी रुपये दर महिन्यास भरणा करतात. मात्र, वीजभरणा केंद्रावर त्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. वीज भरणा

Inconvenient 'shock' in power supply center | वीज भरणा केंद्रात गैरसोयींचा ‘शॉक’

वीज भरणा केंद्रात गैरसोयींचा ‘शॉक’

Next

पिंपरी : शहरातील साडेपाच लाख वीज ग्राहक दर महिन्यास कोट्यवधी रुपये दर महिन्यास भरणा करतात. मात्र, वीजभरणा केंद्रावर त्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. वीज भरणा करून महावितरणाला आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या नागरिकांनाच तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे चित्र आहे.
शहरात पिंपरी व भोसरी हे महावितरणचे दोन विभाग आहेत. महिला बचत गट, पतसंस्था, बॅँका आणि सामाजिक संस्थांच्या शहरातील विविध केंद्रांवर बिले स्वीकारली जातात. नागरिक १०० रुपयांपासून तब्बल ५० हजार रुपयांपर्यंत रकमेचे बिल भरतात. मात्र, त्यांना केंद्रावर स्वागतार्ह वागणूक दिली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. महावितरणचे खासगीकरण होऊनही त्यात बदल झाल्याचे दृष्टीस पडत नसल्याने नागरिकांची नाराजी आहे. पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांची नोट दिल्यास सुटे पैसे देण्याचा आग्रह धरला जातो. त्यामध्ये नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
अनेक केंद्र अडगळीच्या आणि आडोशाला छोट्याशा खोलीत आहेत. त्यामुळे ये-जा करणे त्रासदायक ठरते. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत भरणा केंद्राची वेळ आहे. मात्र, या वेळेत अनेकदा केंद्रात कर्मचारी उपलब्ध नसतात. जेवण्याची वेळ अर्ध्या तासाची असताना तासभर केंद्र बंद ठेवली जातात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागते. वेळ संपण्यास १५ ते २० मिनिटे शिल्लक असतानाच खिडकी बंद केली जाते. त्यामुळे नागरिकांना बिल न भरताच परतावे लागते. साप्ताहिक सुटी, सणासुदीच्या दिवशी केंद्र बंद असते.
सुटीच्या दिवशी वीज खंडितची कारवाई झाल्यास कामकाजाच्या दिवशाची वाट पाहत प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी वाहन लावण्यासाठी वाहनतळाची सुविधा नाही. नाइलाजास्तव रस्त्यावर वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते.
पिंपरी आणि रहाटणी येथील महावितरणच्या केंद्रावर रोख बिल भरण्याचे यंत्र (कॅश पेमेंट बिल मशिन) आहे. ते चोवीस तास सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र, ते अनेकदा बंद असते. कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक उपस्थित असल्याखेरीज येथे रक्कम स्वीकारली जात नाही. हे यंत्र आतील बाजूस असल्याने नागरिकांना थेट या यंत्रात रक्कम भरता येत नाही. (प्रतिनिधी)

अनेक ठिकाणी केंद्रावर नाही छत
अनेक ठिकाणी केंद्रावर छत नाही. उन्हाचा तडाखा सहन करीत नागरिकांना नाईलाजास्तव रांगेत उभे राहावे लागते. पावसात भिजतच प्रतीक्षा करावी लागते. आजूबाजूला साचलेल्या चिखल पाण्यातच रांगा लावल्या जातात. काही केंद्र वरच्या मजल्यावर आहेत. त्या ठिकाणी पायऱ्या चढून जाण्यास वयस्कांना त्रासदायक ठरते. बहुतेक ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. उन्हात दमून-भागून आलेल्या नागरिकांना असंख्य गैरसोयींचा सामना करावा लागतो. अपंगासाठी व्हीलचेअर रॅम्पची सोय कोठेच नाही. बिल भरल्याची पावती आणि बिल एकत्रित करून स्टेपलरची पिन मारून पूर्वी बिल दिले जात होते. आता मात्र ‘स्टेपलर मागू नये’ अशी सूचना खिडकीवर लावली गेली आहे. काही ठिकाणी साध्या टाचणी ठेवल्या आहेत.

‘आॅनलाइन’चाही मनस्ताप
पुणे जिल्ह्यात आॅनलाइन वीज बिल भरणा पिंपरी विभागात सर्वांत मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या आॅनलाइन भरणा करूनही अनेकाना ‘वीज कट’च्या कारवाईस सामोरे जावे लागते. पिंपळे सौदागर भागातील अनेक रहिवाशांना मुदतीत आॅनलाइन बिल भरूनही त्यांची वीज कट केली गेली होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अंधारात दिवस काढावा लागला. आॅनलाइन बिल भरल्याचे अपडेट न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याचे नंतर सावरासावर केली गेली. ई - बॅँकिंगची हाताळणी करता येत नाही.

Web Title: Inconvenient 'shock' in power supply center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.