आकस्मिक आगीत दुकाने भस्मसात
By admin | Published: May 26, 2017 05:45 AM2017-05-26T05:45:21+5:302017-05-26T05:45:21+5:30
येथील जुना मोटारस्टँड येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी दोन इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. आगीत एका दुकानातील संपूर्ण वस्तू खाक झाल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : येथील जुना मोटारस्टँड येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी दोन इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. आगीत एका दुकानातील संपूर्ण वस्तू खाक झाल्या, तर दुसऱ्या दुकानातील साहित्य तत्काळ बाहेर काढले, काही वस्तूंना आगीची झळ बसली. अंदाजे ६०ते ७० लाख रुपायांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी : येथील आशिष इलेक्ट्रॉनिक, मयूरी इलेक्ट्रॉनिक ही दोन दुकाने शेजारी शेजारी आहेत. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यातील मयूरी इलेक्ट्रॉनिक या दुकानाला अचानक आग लागली. आगीचा लोट काही वेळातच वाढत गेल्याने इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले होते. फोटो स्टुडिओतील काही वस्तू जळून खाक झाल्या.
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानांना आग लागल्याने बाजूला राहणाऱ्या लोकांची धांदल उडाली. वेळीच आतमध्ये असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी राजगुरुनगर नगरपरिषद, सेझ व चाकण एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने मागविण्यात आल्या. आग लागलेली दुकाने मोठी असल्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. दरम्यान, येथे बघ्यांनी मोठी गर्दी केली. सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. मात्र, या आगीमध्ये दुकानांतील सर्व साहित्यासह फर्निचर, एक दुचाकी आगीत जळून खाक झाल्याने ६० ते ७० लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.