संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 04:55 PM2023-06-30T16:55:15+5:302023-06-30T16:59:51+5:30
बीएमसीसीच्या नूतन इमारतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन...
पुणे : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या श्री मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, तंत्रज्ञान आपले जीवन सुसह्य करणार आहे, शेतकऱ्यांनाही संपन्न करणार आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांना भविष्यात विविध क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार करावा लागेल. भारताला विश्वगुरू बनविताना ज्ञान-विज्ञानाचा उपयोग करून ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्यासाठी असे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. गरजा आणि साधनस्त्रोताच्या उपलब्धतेवर आधारीत संशोधनाकडे वळावे लागेल. उद्योगांशी समन्वय साधून भविष्यातील तंत्रज्ञान आपल्या महाविद्यालयात शिकविण्याचा विचार केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.
नैतिकता, अर्थशास्त्र आणि पर्यावरण असे समाजाचे तीन महत्वाचे स्तंभ आहेत आणि समाजाच्या शाश्वत विकासासाठी शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे. शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे आपली आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासोबत प्रगल्भ समाज निर्माण करता येतो. ज्ञात प्राप्त झाल्याशिवाय भविष्यातील इतर क्षेत्रात विस्तार करता येणार नाही, असंही गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देताना त्याची गुणवत्ता कायम ठेवून संस्काराधिष्ठित उत्तम नागरिक देशात तयार करण्याचा विचार भारताच्या शिक्षणपद्धतीत केला जातो. इतिहास, संस्कृती आणि वारसा या माध्यमातून आपला समाज प्रगल्भ झाला आहे. मात्र त्यासोबत नाविन्यता, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि जगातील यशस्वी शिक्षण पद्धतीचा अभ्यासही आहे. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक पुरुषोत्तम लोहिया, डेक्क्न एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, प्राचार्य डॉ.जगदीश लांजेकर, जगदीश कदम, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.