जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:55+5:302021-01-02T04:09:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात घट होऊन ते क्षेत्र सोयाबीनकडे वळलेले दिसते आहे. सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे.
सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तेलबियांनाही बसला. काही पिकाची नासाडी झाली असली तरीही क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाल्याची शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर भावना झालेली दिसते. हेक्टरी किती पिक आले त्याची आकडेवारी जिल्हा कृषी विभागाकडून तयार केली जात आहे.
जिल्ह्यातील तेलबीयांचे एकूण क्षेत्र सरासरी ३८ हजार ३६७ हेक्टर आहे. खरीपाच्या हंगामात यंदा ते ४४ हजार २०४ हेक्टर झाले. एकूण ११५ टक्के पेरणी झाली. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनचे जिल्ह्यातील नेहमीचे क्षेत्र १७ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा ते २७ हजार ४६८ हेक्टर झाले.
भुईमूगाचे पेरणी यावर्षी ९९ टक्के झाली. १६ हजार ८९० हेक्टरवर भुईमूग पेरला गेला. पावसामुळे पेरणीस थोडा विलंब झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.
तीळ, कारळे, सूर्यफूल यांचे क्षेत्र तुलनेने यंदा कमी झाले. त्यातही सूर्यफूल पेरणीला फार पसंती मिळालेली दिसत नाही. सूर्यफुलाचे क्षेत्र ३५३ हेक्टर आहे. त्यातील फक्त ३६ टक्के क्षेत्रावर म्हणजे केवळ १२७ हेक्टरवरच पेरणी झाली. तीळाचे क्षेत्र ३१२ हेक्टर आहे. त्यापैकी १९३ हेक्टरवर पेरणी झाली.
बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तेलबियांचे उत्पादन घरच्यासाठी म्हणूनच केले जाते. व्यावसायिक कारणासाठी म्हणून फार कमी ठिकाणी तेलबिया केल्या जातात. अनेक ठिकाणी तेलासाठी घाणा चालवला जातो. त्यासाठीची भुईमूग घेतला जातो. सोयाबीन हे हमखास पैसे देणारे पिक म्हणून आता त्याच्या क्षेत्रात जिल्ह्यामध्ये वाढ होते आहे.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक